
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱया बेस्ट उपक्रमाच्या वातानुकूलित (एसी) बसचा प्रवास सध्या ‘तापदायक’ ठरत आहे. तीव्र उन्हामुळे प्रवाशांचा एसी बसेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या तुलनेत एसी बसेसची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे गाडय़ांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच बस आणि एसीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे बसेसच्या देखभालीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्च महिन्यात मुंबईकरांनी उन्हापासून दिलासा म्हणून बेस्टच्या एसी बसेसमधून प्रवासाला पसंती दिली. 1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत तब्बल 2 कोटी 82 लाख 67 हजार 545 प्रवाशांनी एसी बसमधून प्रवास केला. एवढय़ा मोठय़ा संख्येतील प्रवाशांसाठी केवळ 1943 एसी बसेस रस्त्यावर धावत आहेत. परिणामी, प्रवाशांना बसमध्ये खचाखच गर्दीचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. बसेस कमी, त्यात रस्त्यावर जागोजागी खोदकाम केल्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे बसफेऱयांना उशीर होत आहे. बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. अनेकदा एसी बंद होत असल्यामुळे बसेसचे दरवाजे उघडे ठेवून गाडय़ा हाकल्या जात आहेत. यावर प्रवासी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आम्ही एसी बसेसचे तिकीट काढतो. मात्र वारंवारच्या तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला गर्दी आणि उकाडय़ाचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो, अशी नाराजी साकीनाका येथील दीपक तावडे यांनी व्यक्त केली. काही वेळेला एसी बसेसमध्ये एसी बंद असूनही दरवाजे उघडे ठेवले जात नाहीत. त्यामुळे बसमध्ये गुदमरल्यासारखे होत असल्याच्याही तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
कंत्राटदारांचा निष्काळजीपणा
बेस्टच्या ताफ्यातील सध्या बहुतांश एसी बसेस खासगी पंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. बसच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांची असते. मात्र बसेसच्या देखभालीबाबत त्यांच्याकडून हयगय केली जात आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अपुऱया बसेस तसेच खासगी कंत्राटदारांना चालक उपलब्ध होत नसल्याने अनेकदा बस फेऱया रद्द केल्या जात आहेत.
शहरातील कमी अंतराच्या मार्गावर एसी बसेसमध्ये मोठय़ा संख्येने प्रवासी येतात. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला प्रवासी येतात आणि उतरतात. बसचा दरवाजा वारंवार उघड-बंद केला जात असल्याने तसेच जास्त प्रवासी घेतल्यामुळे एसी योग्यरीत्या चालत नाही, असे बेस्टमधील एका अधिकाऱयाने सांगितले.


























































