
पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाफळ येथील ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन पुलाची सध्या मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली असून, पुरातत्व विभागाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. तसेच अज्ञातांकडून या पुलाच्या पायऱयांची मोडतोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या चाफळनगरीत ब्रिटिशकाळात बांधलेला हा पूल स्थापत्यशास्त्र्ााचा एक उत्तम नमुना मानला जातो. आजही अनेक भाविक आणि पर्यटक या पुलाचा वापर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांनी या पुलाच्या दगडी पायऱयांची आणि कठडय़ांची मोडतोड केली आहे. यामुळे पुलाचे सौंदर्य तर लोप पावत आहेच, पण वास्तूच्या मजबुतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा पूल ऐतिहासिक वारसा असूनही पुरातत्व विभागाकडून याच्या संवर्धनासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप होत आहे. पुलावर वाढलेली झुडपे आणि ठिकठिकाणी पडलेले तडे यामुळे हा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विभागाच्या या दुर्लक्षामुळेच समाजकंटकांचे धाडस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चाफळ हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रशासनाने त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि अज्ञातांचा शोध घेऊन त्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी भाविक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
– मोडतोड करणाऱया अज्ञातांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा.
– पुरतत्व विभागाने पुलाची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
– परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱयांची व्यवस्था करावी.





























































