
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध संपण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांच्या संकेतांमुळे निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरच असल्याने शांततेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आता UAE युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातने (UAE) अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, याची चिंता वाढली आहे.
आखाती युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्धविरामाच्या आशा असताना इराणसोबतच्या युद्धाची व्याप्ती आणखी वाढू शकते अशी चिंता वाढवणारी माहिती मिळत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, संयुक्त अरब अमिरात (UAE) होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांना पूर्ण ताकदीनिशी मदत करण्याची तयारी करत आहे. या निर्णयामुळे, इराणच्या थेट हल्ल्यांना तोंड दिल्यानंतर या संघर्षात सक्रियपणे सहभागी होणारा संयुक्त अरब अमिरात (UAE) आखाती प्रदेशातील पहिला देश बनेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्धचे युद्ध शक्य तितक्या लवकर संपवण्याची योजना आखत आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा मुद्दा नंतरसाठी ठेवत आहेत. त्याचवेळ ही माहिती येत असल्याने चिंता वाढली आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) सुद्धा इराणविरुद्धच्या युद्धात उतरण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन या संघर्षातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, काही आखाती मित्रराष्ट्रे (ज्यात संयुक्त अरब अमिराती आघाडीवर आहे) अमेरिकेला युद्ध सुरू ठेवण्याचा आग्रह करत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) अहवालानुसार, संयुक्त अरब अमिराती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, जो लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता देईल. संयुक्त अरब अमिरातीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर आशियाई लष्करी शक्तींना होर्मुझची सामुद्रधुनी बळजबरीने पुन्हा उघडण्यासाठी एक आघाडी तयार करण्याचे आवाहन केले आहे. ही सामुद्रधुनी आखाती देशांसाठी जीवनरेखा आहे.






























































