
अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच, अमेरिकेच्या संरक्षण विभागात मोठी प्रशासकीय खळबळ उडाली आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवले आहे. पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जनरल जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41 वे लष्करप्रमुख म्हणून तात्काळ प्रभावाने सेवानिवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये पदभार स्वीकारलेले जनरल रँडी जॉर्ज पुढील वर्षापर्यंत या पदावर राहतील अशी शक्यता होती. मात्र, संरक्षण सचिव पीट हेगसेथ गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पदावरून दूर करण्याची योजना आखत होते. जनरल जॉर्ज यांनी माजी संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांचे वरिष्ठ लष्करी सहाय्यक म्हणून काम केले होते. मागील प्रशासनाशी असलेल्या त्यांच्या याच निकटतेमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे मानले जात आहे. हेगसेथ सध्या मागील प्रशासनाच्या धोरणांशी किंवा विचारसरणीशी संबंधित असलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याची मोहीम राबवत असल्याची चर्चा पेंटागॉनमध्ये रंगली आहे.
या कारवाईचा भाग म्हणून केवळ लष्करप्रमुखांनाच नाही, तर इतर दोन मेजर जनरल्सनाही पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. यात चीफ ऑफ चॅपलेन्स मेजर जनरल विल्यम ग्रीन आणि यूएस आर्मी ट्रान्सफॉर्मेशन अँड ट्रेनिंग कमांडचे कमांडिंग जनरल डेव्हिड होडने यांचा समावेश आहे. यापूर्वी हेगसेथ यांनी डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेफ्री क्राउझ, नाटोमधील अमेरिकेच्या प्रतिनिधी व्हाइस ॲडमिरल शोशाना चॅटफिल्ड आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष सी. क्यू. ब्राउन यांनाही पदावरून हटवले होते. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचे यश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यापेक्षा कमी असल्याचे एका मूल्यांकनात समोर आल्यानंतर क्राउझ यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
जनरल जॉर्ज यांच्यानंतर लष्करप्रमुख पदाची धुरा कोण सांभाळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हेगसेथ यांनी अलीकडेच जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यासाठी विशेष आग्रह धरला होता. लानेव्ह यांना भविष्यातील लष्करप्रमुख पदासाठी तयार करण्याची ही एक रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

























































