
आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि. ५) सायंकाळी दोन दिग्गज संघ आमनेसामने येणार आहेत. या हंगामातील पहिल्या साऊथ इंडिया डर्बीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध भिडणार आहे. गतविजेत्या बंगळुरूने विजयाने हंगामाची सुरुवात केली आहे, तर चेन्नईला पहिल्या दोन सामन्यांत सलग पराभवांचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही संघांमधील सामने नेहमीच रोमांचक ठरले आहेत. त्यामुळे सुपर संडेला आणखी एक दमदार सामना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.
‘विराट’ तीनशे षटकारांच्या समीप
उद्घाटनाच्या लढतीत बंगळुरूला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावलेला स्टार खेळाडू विराट कोहली आता ३०० षटकारांच्या टप्प्यापासून फक्त चार षटकार दूर आहे. हा टप्पा गाठल्यावर तो ख्रिस गेल (३५७) आणि रोहित शर्मा (३०८) यांच्या खास पंगतीत सामील होईल. चेत्रई विरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच भेदक राहिली आहे. या संघाविरुद्ध १० अर्धशतकांसह ११४६ धावा त्याच्या नावावर आहेत. चिन्नास्वामी मैदानावर तर त्याचा स्ट्राइक रेट १४९ पर्यंत पोहोचतो.
पॉवर प्लेतील गोलंदाजी चेन्नईची चिंता
चेन्नईसाठी पॉवर प्लेतील गोलंदाजी मोठी चिंता बनली आहे. राजस्थानविरुद्ध ७४ आणि पंजाबविरुद्ध ६८ धावा देत त्यांनी सुरुवातीला मोठी मोकळीक दिली. २०२५ पासून १६ पैकी ८ डावांत चेन्नईने पॉवरप्लेमध्ये ६० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. या काळात चेन्नईला फक्त २१ विकेट्स मिळाल्या असून, इकॉनॉमी जवळपास ९.९ आहे. आता त्यांच्या समोर कोहलीसह फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल या आक्रमक टॉप ऑर्डरचे आव्हान असेल.
दिल्ली कॅपिटल्सचा दमदार विजय! मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून मात
भुवनेश्वर विरुद्ध सॅमसन रोमांचक लढत
या सामन्यात संजू सॅमसन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यातील सामना लक्षवेधी ठरेल. भुवनेश्वरने आयपीएलमध्ये १९ डावांत सॅमसनला ४ वेळा बाद केले आहे. त्याच्याविरुद्ध सॅमसनचा स्ट्राइक रेट फक्त १२६ आहे. भुवनेश्वर २०० आयापीएल विकेट्सच्या उंबरठ्यावर असून, तो हा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरू शकतो. युझवेंद्र चहलनंतर (२२४ विकेट्स) नंतर हा विक्रम करणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल.
चेन्नईची आशा दमदार मिडल ऑर्डर
चेन्नई संघाची सलामी जोडी अपयशी ठरत असली, तरी मिडल ऑर्डर संघासाठी मोठी ताकद ठरत आहे. आयुष म्हात्रेने नुकतीच ४३ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट १९७ आहे. त्याच्यासोबत सरफराज खान आणि शिवम दुबे ही जोडी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सरफराज खान२०२५ पासून टी-२० मध्ये ५४ च्या सरासरीने आणि २०३ च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत आहे, तर शिवम दुबेचा बंगळुरूविरुद्ध खास रेकॉर्ड असून, त्याने ६५.३ च्या सरासरीने आणि १५७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. एकूणच, कोहलीचा फॉर्म आणि बंगळुरूचा आक्रमक टॉप ऑर्डर चेन्नईसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. मात्र, चेन्नईचा मिडल ऑर्डरही तितकाच धोकादायक असल्याने हा सामना रंगतदार होणार एवढं नक्की.
























































