Assam Election 2026 – हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीकडे तिहेरी नागरिकत्व आणि परदेशात मालमत्ता; पवन खेरा यांचे गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपी-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावरच निशाणा साधला आहे. हिमंता सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे तीन देशांचा पासपोर्ट आणि परदेशात मालमत्ता असल्याचा आरोप खेरा यांनी केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रिनिकी सरमा यांच्याकडे इजिप्त, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि अँटिग्वा आणि बार्बुडा या तीन देशांचे पासपोर्ट आहेत. हिंदुस्थानातील कायद्यानुसार दुहेरी किंवा बहुविध नागरिकत्वास परवानगी नसताना हे कसे शक्य आहे? असा सवाल करत केंद्र सरकारने यावर तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागमी खेरा यांनी केली आहे. तसेच रिनिकी सरमा यांनी परदेशातील मालमत्तेची माहिती लपवल्याचा दावाही खेरा यांनी केला आहे.

रिनिकी सरमा यांच्या नावे दुबईत मालमत्ता असून यातील एक मालमत्ता एम ग्रुपशी संबंधित असून दुसरी त्यांच्या नावे नोंदणीकृत आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात या मालमत्तांची माहिती जाहीर का केली नाही? असा सवाल खेरा यांनी उपस्थित केला. तसेच ‘ॲसेट कलेक्टिव्ह एलएलसी’ (Asset Collective LLC) नावाच्या एका कंपनीचा उल्लेख करत सरमा पिता-पुत्र या कंपनीमध्ये भागीदार असल्याचा आरोप खेरा यांनी केला. ही कंपनी अमेरिकेतील वायोमिंग येथे नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते.

या कंपनीचे कथित बजेट 3,467 कोटी अमेरिकन डॉलर्स इतके असून, ती हॉटेल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे खेरा यांनी सांगितले. कंपनीच्या नोंदणीसाठी वायोमिंग या ठिकाणाची निवड करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत, टॅक्स वाचवण्यासाठीच वायोमिंगची निवड केली का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

हे प्रकरण नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करण्याचे आवाहन खेरा यांनी केले आहे. आसामच्या जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. परदेशी पासपोर्ट आणि अघोषित मालमत्तेच्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत, असे खेरा यांनी म्हटले आहे.