अवकाळीने शेती उद्ध्वस्त; 33 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 41 हजार शेतकरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farm
photo coloured with AI

बागलाण तालुक्यात मार्चअखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या सलग अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱयाने शेती अक्षरशः उद्ध्वस्त केली आहे. या सलग आपत्तीमुळे तालुक्यातील 33 हजार 082 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 41 हजार 349 शेतकरी बाधित झाले आहेत. या आपत्तीत कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.

तालुका कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, तालुक्यात कांदा पिकाचे तब्बल 15 हजार 259 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 18 हजारांहून अधिक शेतकरी त्यामुळे प्रभावित झाले आहेत. पावसामुळे कांदा पीक सडून जाणे, जमिनीवर पडणे आणि साठवणुकीतील कांदा खराब होणे, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गारपिटीमुळे कांद्याची पात तुटून पडली आहे, तर साचलेल्या पाण्यामुळे कांदा जमिनीतच सडण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱयांनी कांदा काढून ठेवला होता, त्यांच्या कांद्यालाही पावसाचा फटका बसला आहे.

कांद्याखालोखाल डाळिंब पिकाचे सुमारे एक हजार 572 हेक्टर, तर द्राक्ष पिकाचे सुमारे 627 हेक्टर नुकसान झाले आहे. शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका, भाजीपाल्यासह फळबागांनाही याचा फटका बसला आहे.

30 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पहिला फटका बसल्यानंतर शेतकरी सावरत असतानाच दुसऱया दिवशी 31 मार्च आणि 2 एप्रिलला पुन्हा झालेल्या गारपिटीने उरलेले पीकही जमीनदोस्त केले.

तालुक्यातील अनेक भागांमध्ये कांदा काढून विक्रीसाठी तयार केला होता, पण साठवून ठेवलेला कांदा सडायला लागलाय आणि शेतातला उभा कांदा गारपिटीने पूर्णपणे आडवा झालाय. पदरचे पैसे खर्च करून पीक वाचवलं, पण आता खर्चही निघणं कठीण झालंय. जगायचं कसं, या विवंचनेत आम्ही आहोत.

– संजय पवार, बाधित शेतकरी