
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात रंगलेल्या 6 व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत आता थरार शिगेला पोहोचला असून, अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या लढतींनी स्पर्धेला अक्षरशः ‘फायर मोड’मध्ये आणले आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेत उप उपांत्य फेरीत संजय मांडे, निलांश चिपळूणकर यांनी जोरदार विजय नोंदवत आपली आगेकूच कायम राखली.
पुरुष एकेरीत ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संजय मांडेने अनुभवाचा जबरदस्त वापर करत मुंबईच्या विकास धारीयाविरुद्ध अफलातून कमबॅक केला. पहिला सेट 14-19 असा गमावल्यानंतर संजयने ‘गेम ऑन’ करत पुढील दोन सेट 17-15 आणि 20-19 असे जिंकत अक्षरशः काठावर विजय खेचून आणला. दुसरीकडे, मुंबईच्या निलांश चिपळूणकरनेही तितकाच थरार निर्माण करत कृष्णा वाघमारेवर निसटता विजय मिळवला. पहिला सेट 10-20 असा गमावल्यानंतर निलांशने जोरदार पलटवार करत 25-3 आणि 25-24 असे सेट जिंकत उपांत्य फेरीत दमदार एंट्री केली.
महिला गटात ठाण्याच्या अव्वल मानांकित समृद्धी घाडीगावकरने अंबिका हरिथवर 23-17, 25-2 असा एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. इतर सामन्यांत प्रशांत मोरे, रहीम खान, सोनाली कुमारी, मिताली पाठक आणि आएशा साजिद खान यांनीही प्रभावी कामगिरी करत पुढील फेरी गाठली.




























































