
महाराष्ट्राच्या खो-खो विश्वात आज अक्षरशः ‘गेम चेंजर’ क्षण घडला! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर होताच क्रीडाविश्वात उत्साहाची लाट उसळली. परंपरागत खेळांमध्ये पहिल्यांदाच महिला अध्यक्ष विराजमान होत असल्याने हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक न होता थेट बिनविरोध विजय निश्चित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. धीरज कोल्हे यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष उसळला.
खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब यांसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे ही निवड केवळ औपचारिकता नसून, महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासातील ‘टार्ंनग पॉइंट’ मानली जात आहे. याआधी काही संघटनांमध्ये महिला नेतृत्व दिसले असले तरी खो-खोमध्ये ही क्रांतिकारी घडामोड ठरली आहे. आता सगळ्यांच्या नजरा नव्या नेतृत्वाकडे खिळल्या आहेत. ‘नेतृत्व बदलले की दिशा बदलते’ या विश्वासाने खेळाडूंना अधिक संधी, सुविधा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची नवी दारे उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




























































