
रेल्वे स्थानकाजवळ असलेले पाडा गेट उद्या सोमवारपासून 10 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक कामासाठी गेट बंद राहणार असल्याने 60 हून अधिक गावांमधील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. नेरळ-कळंब राज्यमार्गावरील पाडा गेट हा महत्त्वाचा दुवा आहे. गेट बंद असल्याने प्रवाशांना लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे.
विद्यार्थी, कामगार, चाकरमानी, रुग्ण आणि स्थानिक नागरिकांनाही त्याचा फटका बसणार आहे. पाडा गेटच्या मार्गावर आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी असते. त्याचा प्रवाशांना मनस्ताप होतो. आता हे गेटच बंद राहणार असल्याने त्रासात आणखी भर पडणार आहे. दरम्यान वाहतुकीसाठी पर्याय म्हणून वापरला जाणारा पेशवाई मार्गही अपूर्ण काम, धूळ आणि संथगतीच्या कारभारामुळे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर
रेल्वे प्रशासनाने तांत्रिक दुरुस्तीचे काम रात्रीच्या वेळी करणे अपेक्षित असताना दिवसाढवळ्या नागरिकांना वेठीस धरल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. यानिमित्ताने नेरळ पाडा गेटवर उड्डाणपुलाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.


























































