ठाणे-बोरिवलीचा बोगदा ‘नायक’ खोदणार, उद्यापासून कामाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात लांब ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात येणार आहे. बोगद्याच्या खोदकामासाठी ‘नायक’ नावाच्या मशीनचा वापर केला जाणार आहे. हे मशीन हिंदुस्थानातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक टनल बोरिंग मशीन आहे. त्याच्या मदतीने बोगद्याचे खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार असून हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर ठाणे – बोरिवली हा दीड तासाचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाण्याच्या प्रवासाचा वेळ बराच कमी होणार आहे. ठाणे ते बोरिवली या 11.84 किलोमीटर लांब रस्त्याच्या प्रवासासाठी सद्यस्थितीत 60 ते 90 मिनिटे लागतात. मात्र नव्या बोगद्यामुळे प्रवाशांना लागणारा वेळ अत्यंत कमी होणार आहे. हा बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार आहे.

  • प्रकल्पासाठी अ‍ॅडव्हान्स टनल बोरिंग मशीन लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
  • सद्यस्थितीत ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर मार्गावरून जावे लागते. दररोजच्या वाहतूककोंडीमुळे या प्रवासासाठी एक ते दीड तास लागतो.
  • ‘नायक’ मशीनच्या मदतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरणाला हानी न पोहोचवता जमिनीखालील कठीण खडकांचे खोदकाम सुरक्षितपणे करण्यात येणार आहे.
  • या प्रकल्पामुळे सध्याचा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 20 मिनिटांवर येणार आहे. सुमारे 10 किलोमीटरचा मार्ग दुहेरी बोगद्याचा असणार आहे.