
उधवा-तलासरी राज्य मार्गावर क्राँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने तलासरी वासीयांच्या डोक्याला चांगलाच ताप होत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तासाची रखडपट्टी करावी लागते. तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर करून वाहतूककोंडीतून सुटका करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
उधवा-तलासरी मार्गावरील तलासरी येथील मुख्य बाजारपेठेत क्राँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होती. याचा फटका रुग्णवाहिकेला बसला. शनिवारी सकाळी एका गर्भवती महिलेला तलासरी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाताना रुग्णवाहिका ट्रॅफिककोंडीत अडकली. रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका चालक वारंवार हॉर्न मारत होता. मात्र एकेरी वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अखेर बाजारपेठेतील काही नागरिकांनी पुढे येऊन रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा केला.
सूचना फलक नसल्याने अपघाताची भीती
काँक्रीटीकरणाचे काम करताना ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. उधवा ते संजाण रस्त्यावरील ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या ठिकाणी सूचना फलक न लावल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. शिवाय पर्यायी मार्ग, डिव्हाइंडर, बॅरिकेट, रेडियम, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.




























































