
IPL 2026 ची जुगलबंदी सुरू असून चाहत्यांना थरारक सामने पाहायला मिळत आहेत. IPL च्या या थरारा दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अचानक झालेल्या अंताबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
रणवीर अल्लाहबादियाशी संवाद साधताना पीटरसनने सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगला (IPL) प्राधान्य देण्याच्या त्याच्या निर्णयामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत (ECB) त्याचे मतभेद झाले. पीटरसनच्या मते, याच संघर्षामुळे त्याचे इंग्लंडच्या संघातील स्थान कायमचे गेले आणि त्याचे करिअर अकाली संपुष्टात आले.
पीटरसनने या मुलाखतीत आपल्या संघर्षाचा पाढा वाचताना सांगितले की, “मी खूप मोठा त्याग केला आणि त्यात माझे करिअर गमावले. मी आयपीएल खेळण्याचा आग्रह धरल्यामुळेच क्रिकेट प्रस्थापित मंडळी माझ्या विरोधात गेली.” पीटरसनने वयाच्या 33 व्या वर्षी 104 कसोटी सामने खेळून निवृत्ती घेतली होती. मात्र, जर बोर्डाशी वाद झाला नसता, तर आपण 150 ते 160 कसोटी खेळलो असतो आणि 12,000 पेक्षा जास्त धावा केल्या असत्या, अशी खंतही त्याने यावेळी व्यक्त केली.
स्वतःचे करिअर पणाला लावले असले तरी, आजच्या पिढीतील खेळाडूंसाठी आपण आयपीएलचे दरवाजे उघडल्याचे समाधान पीटरसनने व्यक्त केले. तो म्हणाला की, “आज जोस बटलरसारखे खेळाडू मुक्तपणे आयपीएल खेळत आहेत आणि त्यासाठी त्यांनी माझे आभारही मानले आहेत. माझ्या संघर्षामुळेच आजच्या खेळाडूंना त्याचे फळ मिळत आहे.” एकेकाळी ‘द टेलिग्राफ’ सारख्या माध्यमांचा वापर करून बोर्डाने आपल्यावर निशाणा साधल्याचा आरोपही त्याने केला, मात्र आता आपण शांत आणि सुखी आयुष्य जगत असल्याचे त्याने नमूद केले.



























































