
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा परिसरात बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केलेल्या कारने परिसरात एकच खळबळ उडवली होती. या घटनेमुळे दिल्ली विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात कार जप्त करुन चालकालाही अटक केली आहे.
सोमवारी एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सिएरा कारने विधानसभेचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. ही घटना दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. उत्तर प्रदेश नोंदणी क्रमांकाची ही टाटा सिएरा कार मॉल रोडवरील बंद गेटला धडक देऊन थेट व्हीआयपी प्रवेशद्वारातून विधानसभेच्या आवारात शिरली. या गाडीतील अज्ञात व्यक्तीने थेट अध्यक्षांच्या दालनाबाहेर जाऊन फुलांचा एक गुच्छ ठेवला आणि त्यानंतर पुन्हा गाडी वेगाने चालवत तिथून पळ काढला. या संपूर्ण प्रकारामुळे विधानसभेच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, कारण ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा तिथे सीआरपीएफचे जवान तैनात होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक 2 जवळ अचानक मोठा आवाज झाला आणि त्यांनी पाहिले की कार आधीच गेट तोडून आत आली होती. ही कार काही वेळ विधानसभेच्या आवारात फिरत होती, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. थोड्या वेळाने ती कार पुन्हा त्याच दिशेने आली आणि गेटला धडक देत वेगाने बाहेर पडली.
सुरक्षा व्यवस्थेत मोठी घोडचूक, बॅरिकेट्स तोडून अज्ञात कार दिल्ली विधानसभा परिसरात घुसली, थेट…
पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि संशयित चालकाला अटक केली. प्राथमिक तपासात आरोपीने ठेवलेल्या फुलांच्या गुच्छात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, ही एक दिलासादायक बाब ठरली. ही सर्व घटना अवघ्या पाच मिनिटांत घडली असून, आरोपीचा मुख्य उद्देश काय होता आणि त्याने ही सुरक्षा व्यवस्था का भेदली, याबाबत पोलीस आता त्याची सखोल चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


























































