सत्ताधारी भाजपमध्ये नियोजनाचा अभाव; अवकाळी पावसानंतर महापौर, सभागृहनेत्यांचा स्वंतंत्र बैठकांचा सिलसिला, प्रशासनाने ऐकायचे तरी कोणाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. आता पाऊस थांबला असला तरी पालिकेत महापौरांनंतर सभागृह नेते असा बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. महापालिकेतील पदाधिकारी स्वतंत्र बैठका घेत आहेत. त्यामुळे नियोजनाची मोठी अडचण महापालिका प्रशासनाची होत असून अधिकारी कर्मचार्‍यांनी नक्की ऐकायचे कोणाचे असा सवाल उपस्थित झाला आहे.

शहरात गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांचे कंबरडे मोडले. अनेकांच्या घरात, दुकानांत पाणी शिरले. झाड पडल्याने एका महिलेचा मुत्यू झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली असली तरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी वेगवेगळ्या नियोजनाचा बैठका घेत असल्यामुळे आता नक्की कोणाचे आदेश मानायचे यात महापालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.

गुरूवारी पावसाने दैना झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी सर्व विभाग प्रमुख आणि महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून उपाययोजना आणि पुढील नियोजनासाठी बैठक घेतली. यामध्ये महापालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेण्यात आले. या बैठकीला महापालिकेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र असे न होता आता वेगवेगळ्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.

महापौर यांची बैठक झाल्यानंतर महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सुध्दा सुट्टीच्या दिवशी शनिवारी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. महापालिका प्रशासनाकडुन शहरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. एवढ्यावर न थांबता सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पालिकेच्या नवीन इमारतीत बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन माधव जगताप, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता जगदिश खानोरे, तसेच पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे प्रशासनदेखील बुचकुळ्यात पडले आहे.

भाजप पदाधिकार्‍यांच्यात एकमत नाही!

महापौर यांच्या बैठकीला सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. उपमहापौर तर कोणत्याच बैठकीला दिसत नाही. वास्तविक महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते यांनी एकत्रित बैठकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकार्‍यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येते.