
डोंबिवलीत आज सकाळी ‘आधार’ या 40 वर्षे जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला. स्लॅब कोसळताना भलामोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या दुर्घटनेत सौमेश बित्रा हे किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर खबरदारी म्हणून केडीएमसीने तत्काळ इमारत रिकामी केली. त्यामुळे ‘आधार ‘मधील 45 कुटुंबे एका क्षणात निराधार झाली. पालिकेने आम्हाला हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या कुटुंबांनी पालिकेकडे केली आहे.
पावसाळा सुरू होण्याआधीच डोंबिवलीतील धोकादायक इमारती कोसळू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर 2 परिसरात आधार नावाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. त्यामुळे धोकादायक व जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आधार इमारत दुर्घटनेत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आनंद गोखले यांच्या घराचा स्लॅब कोसळल्याने तळमजल्यावर राहणारे सौमेश बित्रा यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. यावेळी केडीएमसीच्या ‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ठरणार ‘आधार’चे भवितव्य
खबरदारीचा उपाय म्हणून जीर्ण इमारतीतील 45 कुटुंबांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी वास्तुविशारद माधव चिकोडी यांच्यामार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतर इमारत राहण्यास योग्य आहे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
जीव धोक्यात घालून बचावकार्य
बचावकार्यादरम्यान इमारतीत पहिल्या मजल्यावर अडकलेल्या प्रतिभा गोखले या वयोवृद्ध आजीला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून सुरक्षित बाहेर काढले. स्लॅब कोसळला असला तरी परिसरात इमारत कोसळल्याची अफवा पसरली. त्यामुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली.




























































