तोतया पोलिसांचा सापळा; ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटले, एकाच दिवशी दोन घटना घडल्याने भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लुटण्याचा सापळाच आखला आहे. एकाच दिवशी अशाच पद्धतीने तोतया पोलिसांनी दोन वृद्धांना लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल दहा लाखांचे दागिने लुटले. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोडबंदर रोड येथे राहणारे किरण वैद्य हे मॉर्निंग वॉकला गेले असता दोन भामट्यांनी त्यांना अडवले. ‘इथे चेन स्नॅचिंग झाली आहे, दागिने काढून ठेवा,’ असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्यांनी दागिने कागदात गुंडाळून ठेवण्याचा बनाव करत वैद्य यांना बोलण्यात गुंतवले. भामट्यांनी हातचलाखीने बनावट पुडा त्यांच्या हातात देऊन खरे दागिने लंपास केले. यात सुमारे 50 ग्रॅम वजनाची वाघनख लॉकेट असलेली सोन्याची चेन, 40 ग्रॅमचे कडे आणि दोन अंगठ्या असा एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज घेऊन भामटे पसार झाले.

हातचलाखीने चेन लंपास

दुसरी घटना वर्तकनगरमधील पोखरण रोड क्रमांक 1 येथे घडली. व्यंकटेश अय्यर (77) हे मंदिरात जात असताना एकाने ‘आगे पुलिस खडी है’ असे सांगत त्यांना थांबवले. त्यानंतर ‘चेन बॅगमध्ये ठेवा’ असा सल्ला दिला आणि अय्यर यांनी सोन्याची चेन काढली. बॅगेत चेन ठेवत असताना भामट्यांनी हातचलाखीने तीन लाखांची चेन चोरून नेली. काही वेळाने बॅग तपासली असता त्यांना चेन सापडली नाही. या दोन्ही घटनांची नोंद कासारवडवली व वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.