
दिल्लीतील खराब हवामानामुळे मंगळवारी इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात खराब हवामानामुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. एअरलाइन्सने एक्स वर पोस्ट करत, दिल्लीवरील खराब हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत, असे म्हटले आहे.
प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी एअरलाईनची वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे फ्लाइटचे स्टेटस तपासावे, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
दिल्लीतील सफदरजंग, पालम आणि लोधी रोड यांसारख्या भागात मंगळवारी सकाळी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिल्लीत किमान तापमान 20.58 अंश तर कमाल तापमान 31.3 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

























































