
सातत्याने तोट्यात असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिजोरीत गेल्या वर्षभरात केवळ शालेय सहलींच्या माध्यमातून 127 कोटी रुपयांची भर पडली आहे. राज्यातील विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या व्हावी यासाठी शाळांकडून सहली आयोजित केल्या जातात. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जात असल्याने राज्यातील शालेय सहलींसाठी एसटी बसेसना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी शाळांना एसटीकडून सवलतही दिली जाते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळांच्या सहलींसाठी एसटीच्या 25 हजार 558 फेऱ्या झाल्या. त्यातून महामंडळाला 127 कोटी 18 लाख रुपये मिळाले. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न 33 कोटी 29 लाख रुपये जास्त आहे.




























































