
मित्राच्या लग्नात DJ च्या तालावर नाचताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील फुर्डीहेटी गावात घडली. अल्पेश दहागावकर (25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो फुर्डीहेटी गावातील रहिवासी आहे. अल्पेश दहागावकर आपल्या मित्राच्या लग्न उपस्थित होता. लग्नाच्या कार्यक्रमात सायंकाळी DJ च्या गजरात सर्वजण नाचत असताना अल्पेशही उत्साहाने नाचत होता. मात्र अचानक नाचता नाचता तो खाली कोसळला.
सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही, परंतु काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. घटनेनंतर तात्काळ उपस्थितांनी त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली असून, आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेशच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



























































