
सध्या विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया होत नसल्याने नवविवाहीत जोडप्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये विवाहाची नोंद करण्यासाठी गेलेल्या नवविवाहितांना क्यूआर कोड असलेले ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने अनेक शासकीय कामे रखडत असल्याची माहिती चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली.
ग्रामपंचायतींमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया करताना संगणक प्रणालीमध्ये क्यूआर कोड स्कॅन होत नसल्यामुळे ऑनलाईन दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नवविवाहितांना आवश्यक असलेला अधिकृत ऑनलाईन विवाह दाखला मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विवाहापूर्वी मुलीच्या आधारकार्ड व नाव पॅनकार्डवर तिच्या वडिलांचे असते. विवाहानंतर त्या ठिकाणी पतीचे नाव नोंदविणे आवश्यक असते. मात्र यासाठी ऑनलाईन विवाह नोंद दाखला आवश्यक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. ऑफलाईन दाखला ग्राह्य धरला जात नसल्याने नवविवाहीत महिलांना नाव बदलण्याच्या प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत बोलताना शौकत मुकादम म्हणाले की, एखाद्या लष्करी जवानाचे विवाह झाल्यानंतर त्याला दुसऱ्या राज्यातील कार्यालयात विवाहाची ऑनलाईन नोंद सादर करावी लागते. त्या ठिकाणी ऑफलाईन नोंद स्वीकारली जात नसल्यामुळे संबंधित कुटुंबांसमोर मोठी अडचण निर्माण होते. तसेच अनेक नवविवाहितांना परदेशी नोकरीसाठी किंवा इतर कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास ऑनलाईन विवाह दाखला आवश्यक ठरतो. आधारकार्ड आणि पॅनकार्डवर विवाहित महिलेच्या वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव नोंदविण्यासाठीही हा दाखला गरजेचा आहे. त्यामुळे शासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन ऑनलाईन विवाह नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी त्वरित मार्ग काढावा, अशी मागणीही मुकादम यांनी केली आहे.



























































