
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे (प्रभाग २) येथील पाणी समस्या गंभीर बनली असून वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत गाव तळीचे काम सुरू न झाल्यास ८ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
असुर्डे प्रभाग २ (मणवेवाडी , पाताडेवाडी, गुरववाडी, कुळ्येवाडी, लोहारवाडी) या भागाला ‘बोडकीचा बंधारा’ येथून पाणी पुरवठा होतो. मात्र, दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात या बंधाऱ्यातील पाणी आटल्याने भीषण टंचाई निर्माण होते. ग्रामस्थांना पाण्यासाठी ‘गावतळ’ या दुसऱ्या पर्यायी स्त्रोतावर अवलंबून राहावे लागते. जल जीवन मिशनअंतर्गत या तळीच्या कामाचे खोदकाम मे २०२५ मध्ये करण्यात आले, मात्र तेव्हापासून हे काम बंद आहे. खोदकामामुळे जुना स्त्रोतही बंद झाला असून ग्रामस्थांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. हे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (रत्नागिरी) यांच्यासह पालकमंत्री आणि खासदार आमदार यांनाही पाठवण्यात आले आहे. प्रदिप शंकर शिंदे, अशोक सोनू तांबे यांच्यासह ५० हून अधिक ग्रामस्थांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामस्थांच्या मागण्या
गाव तळीचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे.
बोडकीचा बंधारा व जॅकवेलमधील गाळ काढण्यात यावा.
पाणी स्त्रोत बळकट करण्यासाठी जलसंधारणाची कामे आणि पाझर तलाव बांधावा.
आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी देखील मी स्वतः उपोषणाचा इशारा दिला होता, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कंत्राटदाराने अर्धवट खोदकाम करून ठेवल्याने नैसर्गिक स्त्रोतही बाधित झाले आहेत. जर १५ दिवसांत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होईल आणि आम्ही मोर्चावर ठाम राहू.
– प्रदीप शिंदे सरपंच मौजे असुर्डे





























































