मला गुजराती लोकांबद्दल आदर, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केली दिलगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी गुजरातमधील लोकांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर (X) केलेल्या पोस्टमध्ये खर्गे म्हणाले की, केरळमधील निवडणूक सभेत केलेल्या काही वक्तव्यांचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात आहे. तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी नमूद केले.

केरळच्या एका सभेत खर्गे म्हणाले होते की, केरळमधील लोक “शिक्षित आणि हुशार” असून ते दिशाभूल होत नाहीत, मात्र गुजरात आणि काही ठिकाणांतील लोक “अशिक्षित” असल्याचे विधान केले होते. या वक्तव्यावरून भाजपने तीव्र आक्षेप घेतला.

भाजपचे ज्येष्ठ नेते रवी शंकर प्रसाद यांनी खर्गे यांच्या वक्तव्याला “लज्जास्पद, अपमानास्पद आणि निंदनीय” असे संबोधले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या वक्तव्याशी सहमती आहे का, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना राजकीय संवादाची पातळी खालावू नये, असे सांगितले. सार्वजनिक चर्चेत दर्जा राखणे गरजेचे असून नेत्यांनी विधायक मुद्द्यांवर भर द्यावा, असे ते म्हणाले.