
>> उदय जोशी
ऊसतोड कामगारांचा हा जिल्हा वर्षातील सात महिने हातात कोयता घेऊन देशावर जाणारा शेतमजूर कायम कष्टाने पिचला गेला. पिढ्यान् पिढ्या कोयत्याने कणखर झालेले हात आता परिवर्तनाची नांदी ठरत आहेत, त्याच कणखर हाताने आता मुलायम रेशीम निर्माण केले जात आहे. साडेसात हजार शेतकरी रेशीम कोष उबवत आहेत. बीडमध्ये निर्माण झालेली रेशीम बाजार पेठ चार वर्षातच महाराष्ट्राचे रेशीम हब झाले आहे. एवढेच नाही तर बीड देशामध्ये दुसर्या क्रमांकाची रेशीम बाजार पेठ ठरू लागली आहे.
वर्षानुवर्ष कोयता हातात घेऊन नशीब आजमावणार्या बीड जिल्ह्यातील शेतकर्यांनी आता पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली. कोयता हातात घेणारा शेतकरी रेशीम उत्पादन करू लागला, तब्बल साडेसात हजार शेतकरी तुती लागवडीकडे वळले आहेत, चार वर्षात बीड जिल्ह्यातील लागवड क्षेत्र अडीच हजार एकर पर्यंत पोहोचले तर दरवर्षी यात मोठी वाढ होत आहे. आता पर्यंत तुती विक्रीसाठी थेट बंगलोरच्या रामनगरकडे जावे लागत होते. आता रेशीम उद्योगाची बाजार पेठ बीडमध्ये उपलब्ध झाल्याने मोठी कृषी क्रांती होऊ पाहत आहे, बीड राज्याचे रेशीम हब झाले आहे तर देशामध्ये दुसर्या क्रमांकाची बाजार पेठ उदयास आली आहे. बंगलोर सध्या क्रमांक एक वर तर त्यानंतर बीड, नक्कीच ही बाब अभिमानास्पद आहे. दळणवळणासाठी बंगलोर न परवडणारे असल्यामुळे विक्रीसाठी राज्यभरातील शेतकरी बीडला पसंती देत असताना तुती आणि रेशीम खरेदीसाठी पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारत बीडच्या बाजारपेठेकडे आकर्षित होत आहे, खरेदी-विक्री सुलभ होत असल्याने गेल्या एका आठवड्यात बीडमध्ये तब्बल १०३ टन रेशीम माल उपलब्ध झाला आहे. बीड जिल्हा कापसाच्या गठाणी उत्पादनातही देशात दुसर्या क्रमांकावर होता, ऊस आणि साखर उत्पादनातही बीड जिल्ह्याने मोठी झेप घेतली होती. अलीकडे सीताफळ उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यानंतर केशर आंबा लागवडीत ही बीड जिल्ह्याने सात हजार एकर क्षेत्र व्यापले आहे, एकुण फळबाग क्षेत्रच जवळपास ५० हजार एकरवर पोहोचले असताना आता तुती लागवडीमध्ये मोठी प्रगती केली आहे.
उत्तर भारताच्या रेशीम उद्योगाची सर्व मदार बीडवर
रेशीम उद्योगासाठी मिळणारा कच्चा माल आतापर्यंत बंगलोरहून उपलब्ध होत असे मात्र दळणवळणासाठी बंगलोर खर्चिक असल्यामुळे उत्तर भारतासह पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश बीडच्या बाजार पेठेकडे आकर्षित झाले आहेत, एक तर कच्चा माल दर्जेदार अन् दर माफक असल्यामुळे बीडच्या रेशीम कोषाला मोठी मागणी केली जात आहे.
बीडमध्ये एवढे उत्पादन कसे
दुष्काळी बीडमध्ये रेशीम उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे वाढले असा प्रश्न पडू शकतो, बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम कोषाची खरेदी केंद्र सुरू केले. एवढेच नाही तर बाजार समितीने स्वतःचे सात प्रक्रिया प्रकल्प उभे केले. यानंतर बीडमधील नेकनूर, आडस या भागातही प्रक्रिया केंद्र सुरू झाले. हमखास रेशीम खरेदी या ठिकाणी होते. बाजार भावही चांगला मिळतो. यामुळे आतापर्यंत बंगलोरकडे कच्चा माल घेऊन जाणार्या पुणे, नाशिक, जालना येथील शेतकरी आपला रेशीम कोश बीडमध्ये विक्रीसाठी आणू लागले.
नफ्याची शेती
बीड जिल्ह्यात साडेसात हजार क्षेत्र आपल्या अडीच हजार एकरवर तुती लागवड करत आहेत, लागवडीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका वर्षात चारवेळा तुतीचे उत्पादन घेता येते, वर्षाला प्रति एकरी सहा लाख रुपयापर्यंत नफा कमवता येतो. म्हणूनच पारंपरिक शेतीला फाटा देऊन बीड जिल्ह्यातील शेतकरी रेशीमच्या तुती लागवडीकडे वळत आहे.

























































