
आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून अमरावतीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले असून, केवळ कमिशन आणि भ्रष्टाचारासाठी अमरावतीवर भर दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेश येथील ताडेपल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत.
ANI च्या वृत्तानुसार, जगन मोहन रेड्डी यांनी म्हणाले की, “आम्ही विशाखापट्टणम ही प्रशासकीय, कर्नूल ही न्यायिक आणि अमरावती ही वैधानिक राजधानी, असा व्यावहारिक तोडगा मांडला होता. याव्यतिरिक्त मच्छलीपट्टणम, विजयवाडा आणि गुंटूर यांचा समावेश असलेला विकास कॉरिडॉर प्रस्तावित केला होता. केवळ अमरावतीवर २ लाख कोटी रुपये खर्च करण्याऐवजी, त्यातील १० टक्के रक्कम जरी खर्च केली असती, तरी एक सक्षम राजधानी आणि आर्थिक केंद्र निर्माण झाले असते. मात्र केवळ भ्रष्टाचाराच्या उद्देशाने चंद्राबाबू नायडू यांनी हे प्रस्ताव फेटाळले आहेत.”
रेड्डी यांनी दावा केला की, अमरावतीचा वापर आर्थिक शोषणासाठी केला जात आहे. हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये बांधकामाचा खर्च ४,५०० रुपये प्रति चौरस फूट असताना अमरावतीमध्ये हा दर १४,००० रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंत्राटे नातेवाईक आणि बेनामी व्यक्तींना दिली जात असून आगाऊ रक्कम म्हणून हजारो कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत. यामुळे राज्याचा महसूल आणि सामान्य जनतेच्या हिताचे काय होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

























































