तामीळनाडू निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस, कुटुंबाला 10 हजार रुपये, एक फ्रीज आणि महिलांना दर महिन्याला 2 हजार रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडू विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे. मतदारांनी आपल्या निवडून दिले तर मतदारांच्या कुटुंबाला 10 हजार रुपये, एक फ्रीज आणि महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये देऊ, असे आश्वासन उमेदवार देताना दिसत आहेत. तामीळनाडूत एकाच टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे.

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) च्या थिरूपरंगुंद्रम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार राजन चेलप्पा यांनी नागमलई पुदुकोट्टई परिसरात आयोजित एका सभेत बोलताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन दिले. मतदारांनी मला जर निवडून दिले तर मी मतदारांच्या प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देईल. मी तुमच्यासाठी फ्रीज घेऊन येईन. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे अजून बऱयाच योजना आहेत, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. याआधी मदुराई नॉर्थ मतदारसंघातील एआयएडीएमकेचे उमेदवार पी. सरवनन यांनी पुदुर परिसरातील निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना म्हटले होते की, तुम्ही जर मला मतदान केले तर मी तुम्हाला 10 हजार रुपये देईन. तुमच्या घरात फ्रीज घेऊन येईन. तसेच महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना देईन.

g तामीळनाडूत डीएमकेच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स (एसपीए) आणि एआयएडीएमकेच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) यांच्यात थेट लढत होणार आहे. एसपीएमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डीएमडीके आणि व्हीसीके हे पक्ष सहभागी आहेत, तर एनडीएमध्ये एआयएडीएमके, भाजप आणि पीएमके हे पक्ष सहभागी आहेत. अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीकेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात स्वतंत्र उतरला आहे.