
>>पराग खोत
दैनंदिन धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि सततच्या ‘अचिव्हमेंट’च्या हव्यासाने पछाडलेल्या आजच्या जगण्यात माणूस नेमका कुठे उभा आहे, हा मूलभूत प्रश्न उपस्थित करणारे ‘मर्सिया’ हे नाटक प्रेक्षकाला अंतर्मुख करते. वरवर पाहता सुखसोयींनी नटलेले, पण आतून तुटलेले आणि विखुरलेले आयुष्य या नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडत जाते. तुमच्या आमच्या आयुष्यात सतत समोर येणाऱ्या नकारात्मक बातम्या, रस्त्यावरची प्रचंड गर्दी, वाहतुकीची काsंडी, नोकरीतील अस्थिरता या सगळ्या वास्तवाचा मानसिकतेवर होणारा परिणाम ‘मर्सिया’ अत्यंत नेमकेपणाने पकडते. ‘तुमच्या आमच्या जगण्याची पंटेपररी गोष्ट’ असं उपशीर्षक असलेलं हे नाटक अगदी तशीच गोष्ट मांडतं.
‘मर्सिया’ची मध्यवर्ती कथा एका शहरी, सुशिक्षित दाम्पत्याभोवती फिरते. बबन आणि चित्रा हे या नाटकाचे नायक-नायिका. कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारा बबन हा सुरुवातीला यशस्वी, स्थिर वाटणारा तरुण. मात्र कामाचा वाढता ताण, परफॉर्मन्सचे लक्ष्य, वरिष्ठांचा दबाव आणि सततची असुरक्षितता यामुळे त्याच्या मनात अस्थिरतेची बीजं रुजतात. हळूहळू तो नैराश्याकडे ओढला जातो. त्याची पत्नी चित्रा त्याला समजून घेण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. परंतु मानसिक आजाराची गुंतागुंत आणि त्यातील अदृश्य वेदना इतक्या खोलवर असतात की, केवळ सहानुभूतीने किंवा औपचारिक उपचारांनी त्यावर सहज मात करता येत नाही.
नाटकाची खरी ताकद पुढे उलगडते, जेव्हा परिस्थिती अचानक बदलते. चित्रा स्वतःच भावनिक आणि मानसिक तणावाच्या भोवऱ्यात अडकू लागते. अपूर्णतेची भावना, मातृत्वाची ओढ, नात्यातील ताण आणि एकटेपण यामुळे तिच्या मनाचा तोल ढासळू लागतो व याचक्षणी बबन, जो आतापर्यंत स्वतःच्या दुःखात हरवलेला होता, तो तिच्यासाठी उभा राहतो. नात्यातील ही भूमिकांची अदलाबदल केवळ कथानकाला वेगळं वळण देत नाही, तर माणसाच्या मनातील सहनशक्ती, प्रेम आणि जबाबदारीची नव्याने जाणीव करून देते.
लेखक मयूर सरकाळे यांनी आजच्या पिढीच्या मानसिकतेचा वेध घेताना अतिशय प्रामाणिकपणे वास्तव मांडलं आहे. ‘मर्सिया’ हे केवळ एका दाम्पत्याचं कथानक नाही, तर संपूर्ण शहरी मध्यमवर्गीय जीवनाचा आरसा आहे. संवाद कमी होत चाललेले, पण अपेक्षा मात्र वाढत जाणारे नातेसंबंध, सोशल मीडियावर दिसणाऱ्या ‘परफेक्ट’ आयुष्याच्या दबावाखाली कोसळणारी माणसं आणि अंतर्मनात साठत जाणारी पोकळी या सगळ्याचं प्रभावी चित्रण नाटकात दिसतं.
दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी या गुंतागुंतीच्या आशयाला समर्पक रंगमंचीय भाषा दिली आहे. नाटकाची लय, प्रसंगांची बांधणी आणि शांततेचा प्रभावी वापर हे विशेष उल्लेखनीय ठरतात. अनेक प्रसंगांमध्ये संवादांपेक्षा शांतता अधिक बोलकी ठरते आणि तीच प्रेक्षकाला अस्वस्थ करून जाते. ‘डार्क ह्यूमर’चा वापरही त्यांनी अत्यंत संयमाने केला आहे, जिथे हसू येतं, पण त्यामागची कडवट जाणीव लगेच टोचून जाते.
नेपथ्यकार सुमित पाटील यांनी उभारलेलं आलिशान घर हे नाटकातील एक महत्त्वाचं प्रतीक ठरतं. बाहेरून आकर्षक आणि सुबक दिसणारं हे घर, आत मात्र रिकामेपणाने भरलेलं आहे, जणू पात्रांच्या मनाचंच प्रतिबिंब. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना काळानुसार बदलणाऱ्या मनःस्थितीला अधोरेखित करते, तर आशीष गाडे यांचं पार्श्वसंगीत भावनिक चढउतारांना अधोरेखित करतं. पूर्णिमा ओक यांची वेशभूषा व्यक्तिरेखांच्या वास्तवतेला पूरक ठरते.
अभिनयाच्या आघाडीवर विकास पाटील यांनी बबनच्या भूमिकेतून अक्षरशः जिवंत अनुभव दिला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून, देहबोलीतून आणि आवाजातील सूक्ष्म बदलांमधून मानसिक ताणाचं प्रभावी चित्र उभं राहतं. पूर्वा काwशिक यांनी चित्राच्या भूमिकेतून सुरुवातीची समंजसता, नंतरची असहायता आणि शेवटी होणारा मानसिक विस्कळीतपणा अत्यंत नजाकतीने साकारला आहे. या दोघांमधील भावनिक नातं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं. श्रेयस वैद्य आणि समता जाधव यांनी साकारलेली पूरक पात्रं नाटकात थोडासा विरंगुळा देतात, पण त्यांच्याही माध्यमातून वास्तवाचीच किनार जाणवते. जितेंद्र जोशीसारख्या संवेदनशील कलावंताला या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करावीशी वाटली म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी गवसलं असणार.
‘मर्सिया’ हे नाटक केवळ मानसिक आजारावर भाष्य करत नाही, तर त्या आजारामागील जीवनशैली, मूल्ये आणि दृष्टिकोन यांवर प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ औषधोपचार नव्हे, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे किती आवश्यक आहे, हे ते अधोरेखित करते. प्रेक्षक नाटक संपल्यानंतरही विचार करत राहतो, आपण खरंच जगतोय का, की असहाय्यपणे फक्त धावतोय?
एकूणच आजच्या अस्थिर, तणावग्रस्त आणि अंतर्मुख करणाऱ्या जगण्याचं प्रभावी चित्रण करणारे ‘मर्सिया’ हे नाटक केवळ पाहण्याजोगं नाही, तर अनुभवण्याजोगं आहे.
nलेखक ः मयूर सरकाळे
nदिग्दर्शक ः मंगेश सातपुते
nकलाकार ः श्रेयस वैद्य, समता जाधव, पूर्वा काwशिक, विकास पाटील
nनेपथ्य ः सुमित पाटील
nप्रकाश ः अमोघ फडके
nसंगीत ः आशीष गाडे
nवेशभूषा ः पूर्णिमा ओक
nनिर्माता ः जितेंद्र जोशी, पार्थ थिएटर
nछायाचित्र सौजन्य ः संजय पेठे





























































