IPL 2026 – अखेर गुजरात टायटन्स जिंकले; शेवटच्या षटकांत दिल्लीचा नाट्यमयरित्या एका धावेने पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा दिसून आले. अत्यंत चढउताराच्या सामन्यात झंझावाती डेव्हिड मिलर खेळपट्टी उभा असूनही शेवटच्या दोन चेंडूवर अवघ्या दोन धावा दिल्लीला काढता आल्या नाही आणि प्रसिधने गुजरातला एका धावेने नाटयमय विजय मिळवून दिला. दिल्लीची विजयाची हॅटट्रिक हुकली आणि गुजरातने एका धावेने आपला पहिलावहिला विजय नोंदवला.

गुजरातचे 211 धावांच्या आव्हानाचा दिल्लीने सुसाट पाठलाग केला. कर्णधार केएल राहुलने  पथुम निसांकाच्या साथीने 76 धावांची सलामी देत दणदणीत सुरुवात केली. मात्र ही जोडी फुटताच फॉर्मात असलेले नितीश राणा (5) आणि समीर रिझवी (0) या दोघांनी राशीद खानने बाद करून सनसनाटी निर्माण केली. त्यातच डेव्हिड मिलर जखमी होऊन मैदानात परतला.

संघ संकटात सापडला असताना राहुलने विजयासाठी झुंजार खेळ केला, पण त्यांचे भरवशाचे फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे दिल्ली अडचणीत आली. राहुलला शतकाची संधी होती. पण तो 92 धावांवर बाद झाला. तेव्हा दिल्लीने सामना गमावला असे चित्र उभे राहिले होते. मात्र तेव्हा डेव्हिड मिलर मैदानात परतला आणि त्याने वादळासारखा खेळ करत सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने झुकवला. 2 षटकांत 36 धावांची गरज असताना मिलरने सिराजला 23 धावा पह्डून काढल्या. मग शेवटच्या षटकांत केवळ 13 धावांची गरज होती. विपराज निगमने प्रसिधला पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, पण दुसर्या चेंडूवर त्याची विकेट काढली. मग मिलरने चौथ्या चेंडूवर षटकार खेचून संघाला विजयासमीप नेले. मात्र प्रसिधने पुढील दोन चेंडू निर्धाव टाकत सामना फिरवला. शेवटचा चेंडू वाइड असल्यामुळे मिलरला मारता आला नाही आणि चोरटी धाव घेताना कुलदीप यादव धावचीत झाला. चेंडू वाइड मिळावा म्हणून तिसर्या पंचाकडे दाद मागितली, पण त्यांनी तो दिला नाही आणि दिल्ली जिंकता जिंकता एका धावेने हरली. मिलर 41 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी गुजरात टायटन्सच्या आघाडीवीरांनी  अक्षरशः धुमाकूळ घातला. सलामीवीर शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर  यांनी झंझावाती अर्धशतके झळकावत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. साई सुदर्शनचा अवघ्या 12 धावांवर त्रिफळा उडवून मुकेश कुमारने खणखणीत सुरुवात केली. मात्र त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने जोस बटलरच्या साथीने डाव सावरला. मात्र या 60 धावांच्या भागीत बटलरने दिल्लीच्या गोलंदाजांना अक्षरशा पह्डून काढले. त्याने 5 षटकार आणि 2 चौकार खेचत 52 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर  गिलने डावाची सुत्रे हातात घेतली आणि वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने 104 धावांची भागी रचली. गिलने 45 चेंडूंत 70 धावांचा पाऊस पाडला. सुंदरनेही आपल्या फलंदाजीचा नमुना सादर करत 55 धावा चोपून काढल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच एका डावात तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.