
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक उर्वरित 18 महिन्यांच्या कालावधीसाठी होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होते की नाही असा तर्प लावला जात असताना निवडणूक बिनविरोध होण्याची आशा आता धूसर झाली आहे. संतोष देशमुख यांच्या विरोधात केवळ 8 मताने पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख हे निवडणूक मैदानामध्ये उतरत आहेत. तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उद्या सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्व ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून, अश्विनी देशमुख यांना निवडून देणे हीच खरी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर उर्वरित 18 महिन्यांसाठी मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक होत आहे. या घटनेमुळे मस्साजोग प्रकाशझोतात आले होते. आता ही निवडणूक स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बिनविरोध व्हावी असा मनोदय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वाटत असताना स्वरूपानंद देशमुख हे मैदानात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणार असल्याचे ठणकावून सांगत स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे की, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाहेरच्या लोकांना विश्वासात घेऊन चालत नाही तर गावातील प्रत्येक मतदाराला विश्वासात घेतले पाहिजे. मस्साजोगचे राजकारण बाहेरच्या लोकांच्या म्हणण्यावर चालणार नाही. आम्ही सर्वजण संतोष देशमुख यांच्या पुटुंबीयांच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कालही सहभागी होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. मात्र न्यायालयीन लढाई आणि राजकारण वेगळे आहे. त्यांनी आता राजकारणात पडू नये. प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मी गावकऱयांना विनंती करणार आहे, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे.






























































