वैजापूरला खरेदी-विक्री संघाच्या बैठकीत राडा! मिंधे-भाजपच्या सदस्यांनी एकमेकांना ढकलले, व्यवस्थापकाची गचांडी पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरेदी-विक्री संघातून जिल्हा बँकेवर प्रतिनिधी पाठवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत मिंधे आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमेकांना ढकलले. कपडे ओढले. मिंधे गटाच्या रावसाहेब मोटे यांनी व्यवस्थापक अनिल चव्हाण यांची गचांडी पकडली. यामुळे संतापलेल्या साहेबराव औताडे यांनी रावसाहेब मोटे यांचे बखोट धरून त्यांना लोटले. या सगळ्या गदारोळात मिंधे गटाच्या सदस्यांनी सभेचे इतिवृत्त पळवले.

जिल्हा बँकेवर प्रतिनिधी पाठवण्यासाठी आज खरेदी-विक्री संघाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच कोरम पूर्ण नाही, फक्त मर्जीतल्या सदस्यांनाच बैठकीला बोलावण्यात आल्याचा आक्षेप मिंधे गटाचे रावसाहेब मोटे यांनी घेतला. प्रशासक ओंकार देवापुरे यांनी हा आक्षेप मान्य करून सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली. यामुळे एकच गोंधळ झाला. मिंधे गटाचे रावसाहेब मोटे हे व्यवस्थापक अनिल चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. मोटे यांनी चव्हाण यांची गचांडी पकडून त्यांना ढकलून दिले. हे पाहून माजी सभापती साहेबराव औताडे हे संतापले. त्यांनी रावसाहेब मोटे यांना खेचतच दूर लोटले. या सगळ्या गोंधळात रावसाहेब मोटे आणि मिंधे गटाच्या इतर सदस्यांनी बैठकीचे इतिवृत्तच पळवून नेले. गोंधळ संपल्यानंतर सर्वानुमते माजी सभापती साहेबरराव औताडे यांचे नाव बँक प्रतिनिधी म्हणून निश्चित करण्यात आले. या ठरावाचे नवे इतिवृत्त बनवून ते सहायक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले.

तुझा बाप येथे बसला आहे… मिंध्यांची जीभ घसरली

खरेदी-विक्री संघातून बँकेवर प्रतिनिधी पाठवण्यावरून मिंधे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी व्यवस्थापक अनिल चव्हाण यांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ‘तुझे तंगडे तोडून तुला मारतो’, ‘तुझा बाप येथे बसला आहे, तुला कळत नाही का?’ मला ठरावाच्या बाबतीत का कळवण्यात आले नाही, मला न विचारता ठराव का घेतला, असे म्हणत बोरनारे यांनी चव्हाण यांचा पाणउतारा केला.