
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आज जोरदार इनकमिंग झाले. मीरा-भाईंदरमध्ये शिंदे गटाला खिंडार पडले. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी या सर्वांच्या हाती भगवा देऊन आणि शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे विभागप्रमुख तुकाराम भोईर यांच्यासह राजू शिंदे, रमेश राहे, सचिन निघणे, राजू पगारे, दीपक कुरंटे, राजेश भोईर, संजय भोईर, अजय भोईर, नरेश पगारे, दत्ता कुराडे, दीपक मोहंती यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी हाती मशाल चिन्ह घेऊन शिवसेनेचा जयघोष केला.
कार्यक्रमाला जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वय मनोज मयेकर, सदानंद गोसाळकर, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, विधानसभा संघटक सुप्रिया घोसाळकर, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक श्रेया साळवी, मनीषा भोपळे आदी उपस्थित होते.
भगवा डौलाने फडकेल
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा व शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्याच बळावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.



























































