शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करा, बांगलादेशची हिंदुस्थानकडे अधिकृत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-बांग्लादेश संबंधांना नव्या टप्प्यावर नेण्याच्या दृष्टीने बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खालिदुर रहमान यांचा हिंदुस्थान दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा अधिकृतरीत्या पुन्हा उपस्थित करत नवे सरकार या विषयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून प्रथमच हा मुद्दा थेट हिंदुस्थानसमोर मांडण्यात आला आहे.

खालिदुर रहमान यांनी नवी दिल्लीत हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे पुढील पावले उचलण्याचे ठरवले असून, लवकरच अधिकृत स्तरावर पुढील बैठकांचे आयोजन होणार असल्याची माहिती देण्यात आली. जयशंकर यांनी बांगलादेशी नागरिकांसाठी विशेषतः वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कारणांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले.

शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुझ्जमान खान यांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यार्पणासाठी न्यायालयीन प्रक्रियेचे पालन केले जाईल, असे ढाक्याने स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर ताण येऊ नये, याचीही खबरदारी घेतली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, देशांतर्गत राजकारणात या मुद्द्याचे महत्त्व लक्षात घेता, हसीना यांच्या हिंदुस्थानातील उपस्थितीचा परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

या दौऱ्यात खालिदुर रहमान यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. या चर्चेत सुरक्षा, सीमावर्ती प्रश्न आणि प्रादेशिक स्थैर्य यावर सखोल विचारविनिमय झाला. यापूर्वी बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांनी सीमावर्ती भागातील घटनांमुळे आणि काही बांगलादेशी नागरिकांच्या मृत्यूमुळे देशात निर्माण झालेल्या नाराजीबाबत इशारा दिला होता.