‘स्वीटी’ निघाली खोटी; बेकायदेशीरपणे हरिद्वारमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपलं नाव स्वीटी असल्याचे सांगून हरिद्वारमध्ये राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ती बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होती. हरिद्वार पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिच्याकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. अखेर तिला अटक करण्यात आली. तसेच तिला राहण्यासाठी जागा देणाऱ्या एका हिंदुस्थानी पुरुषालाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) नवनीत सिंह यांनी सांगितले की, संशयास्पद व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बुधवारी ज्वालापूर परिसरात पडताळणी मोहीम सुरू असताना या महिलेला ताब्यात घेण्यात आले.

महिलेने सुरुवातीला आपली ओळख ‘स्वीटी’ अशी सांगितली होती, परंतु सखोल चौकशी केल्यानंतर तिने आपली खरी ओळख बांगलादेशातील कोमिला येथील रहिवासी असलेल्या सहेला बेगम (४१) अशी असल्याचे उघड केले, अशी माहिती नवनीत सिंह यांनी दिली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आश्रय देणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकाचीही कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का हे देखील तपासले जात आहे.