
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. विजयचा चित्रपटसृष्टीतील शेवटचा चित्रपट मानला जाणारा ‘जन नायकन’ यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असतानाच हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाला आहे. पायरेडेट साईट्सवर या चित्रपटाचा काही भाग लीक झाल्याने चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केल्याचे विजयच्या टीमने म्हटले आहे.
चित्रपट लीक होण्यापूर्वी सोशल मीडियावर यातील टायटल क्रेडिट्स, विजयची एन्ट्री सीन आणि क्लायमॅक्सचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. सुरुवातीला निर्मात्यांनी तातडीने कारवाई करत हे व्हिडिओ हटवले, मात्र शुक्रवारी सकाळपर्यंत संपूर्ण चित्रपटच पायरेटेड साईट्सवर उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकिपीडिया पेजवरही या लीक झालेल्या लिंकचा समावेश करण्यात आला होता. हा एक व्हायरस किंवा मालवेअर असू शकतो असा इशारा दिला जात आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
A cyber crime complaint has been filed against all accounts sharing leaked #Jananayagan clips. Authorities are actively tracing every ID involved and strict legal action will follow.
— Actor Vijay Team (@ActorVijayTeam) April 9, 2026
दरम्यान, तमिळ चित्रपट लीक करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या TamilMV या साईटने मात्र या प्रकरणात एक वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही अभिनेत्याशी संबंधित राजकीय परिस्थितीबद्दल जागरूक आहोत. आमच्या तत्त्वांनुसार, आम्ही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतरच अपलोड करतो. अधिकृत प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार नाही, असे TamilMV या साईटने म्हटले आहे.
‘जन नायकन’ हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला. या दृश्यामुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात असा दावा करण्यात आला. यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. निर्मात्यांनी या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महिनाभर चाललेल्या कायदेशीर संघर्षांनंतर निर्मात्यांनी खटला मागे घेऊन चित्रपट रिवाइझिंग कमिटीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. सध्या हा चित्रपट कमिटीकडे प्रलंबित असून, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतरच चित्रपटाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, थलपती विजयने राजकारणात पूर्णवेळ प्रवेश करण्यासाठी आपली तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष स्थापन केला असून तो आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. चित्रपटातील राजकीय संवाद आणि निवडणुकीचे वातावरण यामुळेच सेन्सॉर प्रक्रियेत विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम मेनन, प्रकाश राज आणि प्रियमणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.




























































