
प्रस्तावित जातीनिहाय जनगणना रोखण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, एकच अपत्य असलेल्या कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन देणारी धोरणे तयार करावीत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने दाखल केलेली ही याचिका स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे याचिकाकर्ता स्वतः न्यायालयात हजर होते.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने याचिकेमध्ये वापरलेल्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्याला उद्देशून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, ‘या याचिकेत वापरलेली ही भाषा तुम्ही कुठे शिकलात? ही इतकी उद्धट भाषा तुम्ही कशी वापरू शकतात? तुम्ही अशा याचिका लिहिताच कशा? (ये बदतमीजी की लँग्वेज कहाँ से लेकर आते हैं आप लोग? कैसे लिखते हैं आप लोग पिटीशन?)”
त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याचे वृत्त लाइव्ह लॉने दिले आहे.


























































