LDF संपणार, नवा काळ सुरु होणार; केरळमध्ये कमबॅक करण्याचा काँग्रेसचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ विधानसभा निवडणुका पार पडताच काँग्रेसने सत्तांतराचा दावा करत मोठा विजय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी अलप्पुझा येथे बोलताना काँग्रेस-नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) राज्यात स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा दावा केला.

ते म्हणाले, “या निवडणुकीत आम्हाला भव्य विजयाची अपेक्षा आहे. UDF ला बहुमत मिळेल आणि पुढील सरकार आम्ही स्थापन करू. एलडीएफचा कारभार आता संपत आला असून राज्यात नव्या युगाची सुरुवात होईल. केरळमधील जनता एलडीएफच्या सत्तेला कंटाळली आहे आणि बदलासाठी तयार आहे. नेतृत्वाबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाकडून घेतला जाईल.”

दरम्यान, गुरुवारी पार पडलेल्या मतदानात अनेक राज्यांत विक्रमी टक्केवारी नोंदवली गेली. आसाममध्ये 85.38 टक्के, तर पुदुच्चेरीमध्ये 89.83 टक्के मतदान झाले, जे त्या त्या राज्यांतील आतापर्यंतचे सर्वोच्च मतदान ठरले आहे. यापूर्वी आसाममध्ये 2016 मध्ये 84.67 टक्के आणि पुदुच्चेरीमध्ये 2011 मध्ये 86.19 टक्के मतदान झाले होते. केरळमध्येही 78.03 टक्के मतदानाची नोंद झाली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान बहुतांश ठिकाणी शांततेत पार पडले, काही किरकोळ घटना वगळता कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली नाही. यावेळी प्रथमच आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमधील सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के लाइव्ह वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त डॉ. एस.एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

या निवडणुकांमध्ये आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीतील एकूण 296 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. याशिवाय कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरामधील चार मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले. एकूण 5.31 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.