
जागतिक बाजारपेठेतील वाढता दबाव आणि अमेरिकन डॉलरच्या सातत्याने वाढणाऱ्या मजबूतीमुळे हिंदुस्थानी रुपयाला आज पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. डॉलरसमोर रुपयाच्या गटांगळ्या सुरूच आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी कमकुवत होत ९२.६८ प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावर डॉलर निर्देशांकात झालेली वाढ रुपयाच्या या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. ‘PTI’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
आज सकाळी बाजाराची सुरुवात होतानाच रुपया दबावाखाली होता. दिवसभराच्या व्यवहारांत रुपयाने सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणारी भांडवल काढणी आणि आयातदारांकडून डॉलरला असलेली प्रचंड मागणी यामुळे रुपयाची घसरण थांबली नाही. जागतिक भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे कल वाढल्याने प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर अधिक शक्तिशाली झाला असून, त्याचा थेट परिणाम हिंदुस्थानी चलनावर होत आहे.
रुपयाची ही घसरण देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. रुपया कमजोर झाल्यामुळे प्रामुख्याने तेल आयात महागणार असून, त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होऊ शकतो. परदेशी शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या खिशालाही यामुळे मोठी झळ सोसावी लागणार आहे.


























































