इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू, हिंदुस्थानने व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेबनॉनमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल हिंदुस्थानने शुक्रवारी चिंता व्यक्त केली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीत आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घडामोडींवर भाष्य केले.

रणधीर जयस्वाल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लेबनॉनमधील सध्याची परिस्थिती अत्यंत त्रासदायक”आहे. विशेषतः नागरी मृत्यूंच्या वाढत्या संख्येचा अहवाल चिंताजनक असून, हिंदुस्थानने नेहमीच नागरिकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. लेबनॉनमधील शांतता आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन’ (UNIFIL) मध्ये हिंदुस्थानी सैनिकांचे मोठे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर तेथील घटनांचा क्रम हिंदुस्थानसाठी अस्वस्थ करणारा आहे. सध्या लेबनॉनमध्ये सुमारे १००० हिंदुस्थानी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

हिंदुस्थानने या संघर्षादरम्यान आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे आणि राज्यांच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संघर्षात नागरी जीवनाचे रक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. पश्चिम आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी हिंदुस्थान सातत्याने प्रयत्नशील असून, लेबनॉनमधील अस्थिरता लवकरात लवकर संपावी, अशी भूमिका हिंदुस्थाने मांडली आहे.