
बिहार विधानसभेच्या परिसरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी पाटण्यात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, विधानसभेला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
धमकी मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण विधानसभा परिसर रिकामा करण्यात आला असून सुरक्षा रक्षकांनी परिसराचा ताबा घेतला आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून विधानसभेच्या इमारतीसह संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. बिहार पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
परिसरातील प्रत्येक संशयास्पद वस्तूची कसून तपासणी केली जात आहे. खबरदारी म्हणून विधानसभा आणि त्याभोवतीच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याची प्राथमिक माहितीही समोर येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
#WATCH | Patna, Bihar: A bomb squad and police team searched the Bihar Legislative Assembly after receiving a hoax email threat. pic.twitter.com/B2jU5yn5Eh
— ANI (@ANI) April 10, 2026


























































