धक्कादायक! हिंदुस्थानी लष्कराच्या मार्गांचा मागोवा घेण्यासाठी CCTV चा वापर, ११ जण अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानमधील हँडलर्स आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) यांच्या पाठिंब्यावर चालणारे एक दहशतवादी, शस्त्रास्त्रे आणि हेरगिरीचे मॉड्यूल उद्ध्वस्त केले असल्याची माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली.

सीमेपलीकडे बसलेले हँडलर्स हिंदुस्थानाच्या उत्तरेतील संवेदनशील ठिकाणांवर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे गुप्त जाळे बसवून हिंदुस्थानी लष्करी जवानांच्या रिअल-टाइम हालचालींवर कशा प्रकारे लक्ष ठेवून होते, याचा खुलासा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हे पाळत ठेवण्याचे जाळे पंजाबमधील कपूरथला, जालंधर, पठाणकोट, पतियाळा आणि मोगा; हरियाणातील अंबाला; जम्मू आणि कश्मीरमधील कठुआ आणि राजस्थानमधील बिकानेर व अलवर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पसरलेले होते. ज्या भागात लष्करी छावण्यांसाठी, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेली स्थाने आणि सैन्याची हालचाल व रसद पुरवठ्याचे प्रमुख मार्ग म्हणून या सर्व शहरांचे महत्त्व मोठे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी ठिकाणी, सैन्याच्या जमवाजमवासाठी वापरले जाणारे महामार्ग आणि सीमेशी संबंधित पायाभूत सुविधांजवळील हालचाली टिपण्यासाठी हे कॅमेरे मुद्दाम अशा विशिष्ट ठिकाणी बसवण्यात आले होते.

या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे उपकरणे थेट पाकिस्तानातील हँडलर्सना ‘लाईव्ह फुटेज’ प्रसारित करत होते, ज्यामुळे त्यांना ‘सीमेपलीकडे बसून भारतीय लष्कराच्या हालचाली रिअल टाइममध्ये पाहणे’ शक्य झाले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून हेरगिरी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि रेकी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ११ आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी सांगितले की, हे जाळे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या सूचनेनुसार काम करत होते, ज्यामध्ये हस्तकांना देखरेख उपकरणे बसवण्याचे आणि संवेदनशील भागातील व्हिडीओ पाठवण्याचे काम देण्यात आले होते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वापरामुळे दुर्गम किंवा निवडक व्यक्तींनाच प्रवेश असलेल्या भागातही सतत देखरेख करणे सहज झाले होते. विशेष म्हणजे सौरऊर्जेवर चालणारे उपकरण असल्याने त्यांना हे चित्रण करण्यात कोणतीही अडचण येत नव्हती.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) प्रमोद सिंह कुशवाह म्हणाले की, ‘हे कॅमेरे बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवलेल्या सिम कार्डांवर सुरू होते. मोबाईल ॲप्लिकेशन्सशी जोडलेले होते, ज्यामुळे सीमेपलीकडे फुटेजचे अखंड रिअल-टाइम प्रसारित होणे शक्य झाले’. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी उपकरणे बसवण्यापूर्वी अगदी बारकाईने रेकी केली होती आणि लष्करी छावण्या, सीमा रस्ते आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे मार्ग स्पष्टपणे दिसतील अशा मोक्याच्या ठिकाणांची काळजीपूर्वक निवड केली होती. हे फुटेज नंतर पाकिस्तानमधील हँडलर्सद्वारे लष्करी हालचालींचे नमुने समजून घेण्यासाठी, कमकुवत दुवे शोधण्यासाठी आणि पुढील कारवायांचे नियोजन करण्यासाठी वापरले जात असे असे आऊटलूकच्या वृत्तात म्हटले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘याचा उद्देश केवळ देखरेख करणे हा नव्हता, तर ठराविक कालावधीत संरक्षण दलांच्या हालचालींचे निरीक्षण करणे हा होता’. अशा माहितीचा वापर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी किंवा हिंदुस्थानात सहजरितीने कारवाया करण्यासाठी केला जाऊ शकला असता, असेही त्यांनी पुष्टी केली. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, ‘ही कारवाई दोन टप्प्यात करण्यात आली. पहिल्या मोहिमेत पंजाब आणि दिल्लीतून सहा आरोपींना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून नऊ सीसीटीव्ही कॅमेरे, चार पिस्तूल आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात, मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रेकी आणि डेटा शेअरिंगमध्ये सक्रिय असलेल्या आणखी पाच जणांना अटक करण्यात आली.’

तपासात असे समोर आले आहे की, आरोपींना पैशांच्या आमिषाने या जाळ्यात ओढण्यात आले होते आणि ते रसद पुरवणे, सिम कार्ड मिळवणे, उपकरणांची वाहतूक करणे आणि गुप्तहेरांचे जाळे पसरवणे यांसारख्या कामांमध्येही सहभागी होते. तर यापैकी काहींना स्थानिक तरुणांची भरती करण्याचे काम देखील देण्यात आले होते.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘यातील एक मुख्य आरोपी मनप्रीत सिंग (पंजाब) हा पाकिस्तानातील हँडलर्सच्या थेट संपर्कात असल्याचे आढळले असून तो संवाद साधण्यात आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. इतर फील्डवरील लोक हे प्रत्यक्ष कॅमेरे बसवण्यासाठी काम करत होते.’ पोलिसांनी सांगितले की, या कारवाईमुळे संभाव्यतः मोठा धोका टळला आहे, कारण हे मॉड्यूल स्फोटकांचा आणि इतर माध्यमांचा वापर करून लष्करांच्या लक्ष्य करण्याच्या योजनांवरही काम करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. हेरगिरी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादी कटांचे नियोजन हे यातून स्पष्ट दिसत आहे.

सुरक्षा यंत्रणा आता मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही सिस्टीममधून मिळवलेला डेटा यासह डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करत आहेत, जेणेकरून पुढील दुवे, हँडलर्स आणि स्लीपर सेल्सची ओळख पटवता येईल. या प्रकरणाचा तपास सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेली नाही.