
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही नाशिक शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून नाशिकची जनता रस्त्यावर उतरली आहे. या वृक्षतोडीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला.
”गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या नैसर्गिक संपत्तीचा नाश करून नाशिकला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिकच्या भविष्यासाठी लढणाऱ्या नागरिकांसोबत आमची युवासेना सक्रियपणे आंदोलन करत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी उभ्या असलेल्या प्रत्येकासोबत, आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत.२०० वर्षे जुनी प्राचीन झाडे असोत किंवा शहरी जंगलं ‘विकासा’च्या नावाखाली भाजप सरकारकडून त्यांची तोड सुरू आहे. झाडांसोबतच त्यांना वाचवणाऱ्या नागरिकांवरही बळाचा वापर होत आहे. विकास म्हणजे जीवनमान उंचावणे… शाश्वतता… आणि उज्ज्वल भविष्य! पण भाजपसाठी विकास म्हणजे बिल्डर-कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल. आमचा याला ठाम विरोध आहे. नाशिककरांच्या शाश्वत भविष्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.



























































