जन्मदर प्रमाण आणि साक्षरतेच्या बाबत आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाला घेतले फैलावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंदाज समितीच्या आज झालेल्या तिसर्‍या दिवशीच्या आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातील जन्मदराबद्दल असलेली तफावत तसेच साक्षरतेच्या प्रमाणावर प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. तीन दिवसीय अंदाज समितीची आज समारोपाची बैठक नियोजन भवन येथे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात स्त्री, पुरुष जन्माचे प्रमाण हे अत्यंत कमी असून, हे चित्र विदारक आहे. ८४ पुरुषांच्या मागे ६६ महिला हे प्रमाण खूपच चिंताजनक आहे. असे असेल तर स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करत आहे, गर्भनिदान मोहिम प्रभावी राबवली जात नाही काय, तेलंगणा राज्य या जिल्ह्यापासून जवळच आहे. त्याठिकाणी गर्भपात होतात का, याची प्रशासनाला किती माहिती आहे, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी यावेळी केला. एकीकडे सीमेवरील मंडळी तेलंगणात जाण्यास इच्छूक असल्याच्या बातम्या काही दिवसापूर्वी आल्या होत्या. याबद्दल जनमानसात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तेलंगणा राज्यासाठी सगरोळी येथील रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रस्ता तयार करण्यात आला आहे. याठिकाणची वाळू सर्वांच्या डोळ्यासमोर तेलंगणात जात आहे. वाळूचा उपसा आणि प्रत्यक्ष होणारा उपसा यातील प्रमाण भयानक असून, आजही या घाटावर मोठ्या प्रमाणात यंत्राव्दारे रेती उपसा केला जात आहे. हि बाब भयानक असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. सीमेलगतची मंडळी तेलंगणात जाण्यास का इच्छूक आहे याची कारण मिमांसा प्रशासनाने केली का, धान उत्पादन शेतकर्‍यांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील किती धान्य हे आपल्या राज्यात खरेदी व विक्री केल्या जाते याचा अभ्यास प्रशासनाने केला पाहिजे. दुसरीकडे साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्क्यावर आले आहे. निरंतर शाळा, रात्रीच्या शाळा, निरक्षरांसाठी राबवलेली मोहिम, शाळेमध्ये होणारे जनजागरण या सर्व बाबी केवळ कागदावर होतात का, साक्षरतेचे हे प्रमाण वाढलेच पाहिजे तसेच स्त्री, पुरुष जन्मदर प्रमाण यावर देखील प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कारभाराचे गेल्या दोन दिवसात वाभाडे काढत कैलास पाटील यांनी सर्वच प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार बोकाळला आहे. विशेषतः बिओटी तत्वावर देण्यात आलेली कामे, कचरा, डपिंग हाऊस, रस्त्यांची कामे, अमृत-२ योजना या कामात असलेली अनियमितता हि गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

वादग्रस्त सगरोळी घाटाची परिस्थिती पाहून अंदाज समितीच्या पथकाला बसला धक्का

कैलास पाटील यांच्या सुचनेवरुन अंदाज समितीच्या पथकाने वादग्रस्त सगरोळी घाटावर भेट देवून तेथील साठवलेल्या रेतीचा डोंगर बघून समिती चक्रावून गेली. याबाबत संबंधितावर पंचनामा करुन कारवाई करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.

जिल्हा दौर्‍यादरम्यान गुरुवारी (दि.९) सायंकाळी बिलोली तालुक्यातील सगरोळी-येसगी वाळू घाटावर महसूल प्रशासनाचा काळा कारभार चव्हाट्यावर आला. नदीपात्राची झालेली चाळण आणि साठवून ठेवलेले वाळूचे अवाढव्य ढिगारे पाहून समितीने तीव्र संताप व्यक्त केला. आमदार कैलास पाटील हे अंदाज समितीचे सदस्य आहेत. त्यांना काही मंडळींनी एक महिन्यापूर्वीच या संदर्भातील रितसर तक्रार पुराव्यासह सादर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्या अत्यंत गोपनिय पध्दतीच्या निर्णयामुळे प्रशासनाला याची कुणकुणच लागली नाही. अचानकपणे समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, आमदार वैâलास पाटील, आमदार हेमंत पाटील व अन्य सदस्य आपल्या गाड्यांचा ताफा अचानक सगरोळीकडे वळविला.विशेष म्हणजे, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे कार्यालय असलेल्या ठिकाणीच नाकाखालून सुरू असलेला हा प्रकार पाहून समितीने महसूल यंत्रणेच्या कर्तव्यावर ताशेरे ओढले असून, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.