
समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९३ (मुंबई कॉरिडॉर) येथे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला. या घटनेत २ जण गंभीर जखमी झाले असून ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मदतकार्यासाठी धावून आलेले ट्रक चालक आणि कर्तव्यावर असलेले एमएसएफ (MSF) जवानही या अपघाताच्या कचाट्यात सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी दुपारी ४:१८ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील शशांक कृष्णा खेरणार (वय २५) हे आपल्या नेक्सा कारने (MH 17 BV 0061) मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या कारने समोरील एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, शशांक खेरणार यात गंभीर जखमी झाले.
मदत करतानाच दुसऱ्या वाहनांची धडक
अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच, पाठीमागून येणाऱ्या औरा कारच्या (MH 14 MH 2138) चालकाने समोर असलेल्या नवीन इनोव्हा कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की औरा आणि इनोव्हा या दोन्ही कार पुढे असलेल्या नेक्सा कारवर जाऊन आदळल्या.
या दुसऱ्या धडकेत मदतीसाठी थांबलेले ट्रक चालक मोईजोद्दीन मोहम्मद शेख (रा. वसई) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच कर्तव्यावर असलेले एमएसएफ जवान आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे आणि फायरचे जवान परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. औरा कारमधील अमित बोंडे आणि तेजस वाघोरे हे देखील किरकोळ जखमी झाले असून, या कारचा चालक अक्षय चनाप (रा. बार्शी टाकळी) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. सुदैवाने इनोव्हा चालक निजाम खान वकील खान हे यातून सुखरूप बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजा उपकेंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कायंदे, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन, पोलीस कॉन्स्टेबल सागर कुटे, भागवत पवार यांच्यासह अंमलदार (HC 2232, PC 477, 1217, 183, 2539, HC 1115), एमएसएफ जवान आणि क्यूआरव्ही (QRV) टीम अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना रुग्णवाहिके द्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलवले.७ जखमी पैकी गंभीर दोघांना एकास जालना तर दुस-यास मुंबई ला नातेवाईक घेऊन गेले असल्याचे समजले.
अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून बॅरिगेटिंग करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.


























































