
शेअर बाजारात डिसेंबर 2025 पर्यंत 89 हजार कोटी रुपयांची रक्कम एपूण 1 हजार 671 लिस्टेड कंपन्यांमध्ये पडून आहे, अशी माहिती एका फायनान्स मॅग्झिनच्या अहवालातून समोर आली आहे. ही सर्व रक्कम इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटीकडे (आयईपीएफए) पडून आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, बँक डिपॉझिट, शेअर्स, इन्शुरन्स आणि ईपीएफसारख्या सेक्टरमध्ये एपूण 2.2 लाख कोटींहून अधिकची संपत्ती आहे. याचे कोणीच वारसदार सापडला नाही. जवळपास 166 कोटी शेअर्स असे आहेत, ज्यावर अद्याप कोणताही दावा सांगितला नाही. यात रिलायन्ससह अन्य मोठय़ा कंपन्यांचा समावेश आहे. एपूण जेवढय़ा कंपन्यांचे शेअर्स बेवारस आहेत, विम्यामध्ये 20062 कोटी रुपये अनक्लेम्ड आहेत. ही रक्कम मॅच्युरिटी, डेथ क्लेम किंवा सरेंडर व्हॅल्यूच्या रूपात आहे. ईपीएफमध्ये 10,915 कोटी रुपये बेवारस आहेत. 38 टक्के ईपीएफ खाती पाच ते दहा वर्षांपासून निष्क्रिय आहेत, तर 21 टक्के खाती 20 वर्षांपासून क्लेमविना पडून आहेत. म्युच्युअल फंडमध्ये 3452 कोटी रुपये अनक्लेम्ड आहेत.
-गुंतवणूक करताना नॉमिनीचे नाव न जोडणे, वेळोवेळी अपडेट न करणे, गुंतवणूक केल्याची माहिती कुटुंबातील कोणत्याही सदस्याला न देणे, क्लेम प्रक्रियेची माहिती नसणे यांसारख्या कारणांमुळे हा पैसा पडून आहे. कुटुंबातील सदस्यांना जर आधीच याची माहिती दिली असती तर त्यांनी या पैशांवर दावा दाखल केला असता, परंतु त्यांना याची काहीच माहिती नसल्याने या पैशांना वारसदार मिळणे अवघड झाले आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. बेवारस बँक डिपॉझिट शोधण्यासाठी आरबीआयने यूडीजीएएम पोर्टल उघडले आहे.


























































