न्या. यशवंत वर्मा यांचा राजीनामा, बंगल्यात सापडली होती नोटांची जळालेली बंडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांच्या सरकारी निवासस्थानामध्ये लागलेल्या आगी- दरम्यान 500 रुपयांच्या नोटांची अनेक बंडले जळालेल्या अवस्थेत सापडली होती, ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. आपण तत्काळ पदमुक्त होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्या वर्षी 14 मार्च रोजी न्या. यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानामध्ये आग लागली. त्यावेळी त्यांच्या स्टोर रुममध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांची अनेक बंडले पोत्यांमध्ये सापडली होती; मात्र आपल्या घरात कोणतीही रोख रक्कम नव्हती, आपल्याला फसवण्यात आल्याचा दावा न्या. वर्मा यांनी केला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने न्या. वर्मा यांना दोषी ठरवले होते. न्या. वर्मा यांच्याविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नव्हता.

राजीनामा देताना काय म्हणाले न्या. वर्मा?

राष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनामा पत्रात न्या. वर्मा यांनी लिहिले आहे, की मला ज्या कारणांमुळे हे पत्र लिहावे लागत आहे, त्या कारणांमुळे मी आपल्या सन्माननीय कार्यालयाला त्रास देऊ इच्छित नाही. मात्र, अतिशय दुःखाने मी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.

  • न्या. वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात सुरू असलेली महाभियोग प्रस्तावावरील कारवाई थांबू शकते. महाभियोगाद्वारे आजपर्यंत एकाही न्यायाधीशाला हटविण्यात आलेले नाही. न्या. वर्मा यांना हटविण्यात आले असते तर ते निवृत्तीनंतरच्या इतर लाभांपासून वंचित राहिले असते. दरम्यान, ते आता सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कारवाई होऊ शकते.