IPL 2026 – वैभवच्या वादळात आरसीबी उडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे ज्या शोवर लक्ष लागले होते त्या वैभव सूर्यवंशीने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही धुव्वा उडवला. वैभवच्या वादळी खेळीने अवघ्या २६ चेंडूंत ७ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी करत ७६ धावांचा पाऊस पाडत राजस्थान रॉयल्सला विजयाचा चौकार खेचून दिला. राजस्थानने २ षटके आणि ६ विकेट राखून आरसीबीला नमवले. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले

बंगळुरूचे २०२ धावांचे आव्हानही तुटपुंजे ठरणार, हे आधीच जाणवत होते आणि झालेही तसेच. यशस्वी जैसवालने आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या जॉश हेझलवूडचे दोन षटकार खेचत दणदणीत स्वागत केले. मात्र हेझलवूडने आपल्या शेवटच्या चेंडूवर यशस्वीची विकेट काढत आरसीबीला मोठे यश मिळवून दिले पण या विकेटचा आरसीबीला वैभवच्या झंझावाताने जराही फायदा होऊ दिला नाही. त्यानंतर वैभवने आपल्या नेहमीच्या शैलीत सर्वच गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १५ चेंडूंत ४ षटकार आणि ७ चौकार खेचत अर्धशतक ठोकले. त्याच्या ४८ धावा चौकार-षटकाराच्याच होत्या. त्यानंतरही त्याचा घणाघात कायम होता. त्याने संघाला ६.२ षटकांतच शंभरी गाठून दिली. नवव्या षटकात वैभवची खेळी ७६ धावांवर थांबल्यानंतर राजस्थानला तीन हादरे बसले आणि त्यांची १ बाद १२९ वरून ४ बाद १३४ अशी घसरगुंडी उडाली. मात्र त्यानंतर ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजाने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत २०२ धावांचे लक्ष्य १८ व्या षटकांतच गाठले जुरेलने ४३ चेंडूंत नाबाद ८१ धावा केल्या तर जाडेजाने २४ धावा काढल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागी केली. त्याआधी आरसीबीने विराट कोहलीच्या ३२. रजत पाटीदारच्या ४० चेंडूंतील ६ ३ धावांच्या खेळीच्या जोरावर दोनशेच्या टप्पा गाठला आरसीबीचे आघाडीवीर अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील रोमारिओ शेफर्ड (२२) आणि वेंकटेश अय्यर (२९) यांनी संघाला अनपेक्षितपणे दोनशेपार नेले.