
>> अशोक बेंडखळे
आपल्याकडे अठराव्या वा एकोणिसाव्या शतकात अनेक मराठी माणसे हिंदुस्थानभर फिरली, परंतु त्यापैकी कुणी रोजनिशी लिहिली असे आढळत नाही. त्याला एक अपवाद म्हणजे गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहिलेले ‘माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी)’ हे पुस्तक होय. पुस्तकाची पहिली आवृत्ती 1896 मध्ये बडोदे इथे श्रीमंत गायकवाड सरकार यांच्या मदतीने प्रसिद्ध झाली आहे, तर दुसरी आवृत्ती मुंबईच्या माध्यम प्रकाशनाने जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित केली आहे.
गोविंद बाबाजींनी दोन उद्देशाने भारतभर प्रवास केला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संस्थात्मक कामासाठी भाषणे देऊन ग्रामसभा स्थापन करणे आणि प्रवास वर्णनातून दिसून येणारी लोकस्थिती रोजनिशीमधून मांडणे. त्यांनी वसई, भिवंडी, केळवे, तारापूर, डहाणू, उंबरगाव, पनवेल, पेण, अलिबाग, रेवदंडा, महाड बदलापूर, मुरबाड, पुणे, सातारा, कऱहाड, कोल्हापूर, राजापूर, बलसाड, सुरत, अहमदाबाद, नाशिक, इगतपुरी, चाळीसगाव, भुसावळ, इंदूर, बडोदे आदी 65 शहरांना भेटी दिल्या आणि त्या शहरात पाहिलेल्या मनोरंजक बाबींची नोंद केली.
लोकस्थिती प्रकरणामध्ये 1846 च्या शाळांच्या रचनेविषयी लिहिले आहे ते असे – ‘मुले कितीही असली तरी शाळेवर मास्तर बहुत करून एकच असे. मुलांना अभ्यासाची पुस्तके आपल्या खर्चानी विकत घ्यावी लागत नसत. सरकारातून एक किंवा दोन प्रती शाळेकरिता येत. त्या पंतोजी वाचीत असे. कधी कधी मुलांस वाचण्यास देई आणि इतर मुलांनी ऐकावयाचे असा अभ्यास चाले. लग्नाच्या संबंधात गणगोत्र पाहण्यापेक्षा जातकुळ श्रेष्ठ मानली जात असे. म्हणजे आधी जात कुळीचा शोध घ्यायचा, ती योग्य ठरली तर मग गणगोत्र पत्रिका पाहायची. गुजराथेत सर्वत्र मराठय़ांस भाऊ म्हणत, मराठय़ांविषयी आदरभाव होता, त्यांचे चांगले स्वागत केले जाई. विडय़ा विकणे, पागोटी बांधणे हे नवीन धंदे बनले होते. त्या वेळी आगगाडय़ा हिंदुस्थानात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवास बहुतकरून बैलगाडीने होई.’
लेखकाने 1867 ते 1877 असा दहा वर्षे एकंदर तीन हजार मैल इतका प्रवास केला. त्यापैकी बैलगाडीने 2241 मैल, जलमार्गाने 257 मैल, घोडय़ावर 191 मैल आणि पायी 190 मैल. एकंदर 65 गावी त्यांनी सार्वजिक विषयांवर प्रबोधनपर भाषणे केली ती ऐकण्यास पाच हजारांहून अधिक लोक आल्याची नोंद केली आहे.
लेखकाला या दीर्घ प्रवासात काही विचित्र अनुभव आले ते मनोरंजक आहेत. केळवे माहीम इथे त्यांनी भाषणात पुस्तकालय असावे असा प्रस्ताव मांडला. त्याला पुढारी धोंडूअप्पा दांडेकर यांनीच विरोध केला. कारण चटोर पोरं अद्वातद्वा बडबड करतील म्हणून. सासवड गावात एक वकील आढळला. तेव्हाच्या जातीनिहाय व्यवस्थेमुळे मामलेदार कोर्टात काम करताना त्याला दुरून सवाल जबाब द्यावे लागत. लेखक देऊरगावी (साताऱयाजवळ) शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या भोसले वाडय़ात उतरले. मात्र महापुरुषाचा वंशज साधारण स्थितीत राहत होता, ही एक आश्चर्याची बाब आढळली. कराडजवळील आष्टे गावी मुसलमान लोक दाढी ठेवित नाहीत. फक्त टाळूवर केस शेंडी ठेवित इतकाच फरक. सर्व पोषाख हिंदूप्रमाणे करीत. मुसलमान हलवाई होते आणि त्यांनी केलेली मिठाई इतर धर्मीयही आवडीने खात. यात कोल्हापूर प्रांतातील जोगतीनींचा उल्लेख येतो. ज्यात ठराविक जातीतील स्त्राr लग्ने करीत नाहीत, एलम्मा देवीच्या भक्तीनी होतात. वर्ष-दोन वर्षांच्या कराराने एखाद्यास पसंत करून त्यास पतीचा अधिकार देतात. मुदत वाढवणे वा संबंध मोडणे दोघांच्या मर्जीवर असते. मुलं झाली तर इस्टेटीवर मुलीचा हक्क असतो. मराठय़ांच्या लष्करात या स्त्रिया नोकरीसाठी जात असाही उल्लेख येतो.
लेखकाचा बडोदे संस्थानात चार महिने मुक्काम होता. तेथील केळकर यांच्या लायब्ररीतील धक्क्यावर त्यांनी काही भाषणे केली व आपापसातील कलहाने देशाची कशी दुर्दशा होते ते सांगितले. श्रीमंत मल्हारराव यांच्याशी तीन भेटी झाल्या. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन महाराजानी त्यांना प्रवास खर्चासाठी 200 रुपयांचे वर्षासन दिले. पुढे सयाजीराव महाराज गादीवर बसल्यावर त्यांचे दिवाण माधवराव यांनी त्यांना बडोदे संस्थानात नोकरी करण्याविषयी विचारले. शेवटी आर्थिक तंगीने त्रस्त होऊन ते 17 मार्च 1877 रोजी पब्लिक प्रीचर म्हणून नोकरीस रुजू झाले. इथे गोविंद बाबाजी जोशी या समाज सुधारकाची हकिकत संपते.
विष्णुभट गोडसे यांचा ‘माझा प्रवास’ हा अर्थप्राप्तीसाठी युद्धभूमीवर केलेला प्रवास आहे, तर गोविंद बाळाजी यांचा प्रवास समाज सुधारणेच्या हेतूने केलेला आहे. या प्रवास वर्णनात लोकांची राहणी व विचार यांचे जसे प्रतिबिंब पडलेले आहे, त्याचप्रमाणे गावोगावच्या उत्पादनांची इमारतींची इतकेच काय पण शब्दोच्चारांची वैशिष्टय़ेही नोंदवली आहेत. गावांचा इतिहास, भेटलेले महत्त्वाचे लोक, सभेला हजर असलेले लोक, भाषणातले मुद्दे, वादावादी यांनी रोजनिशी रंजक झाली आहे.
रोजनिशीतील मराठी देश व समाज यांची वर्णने प्रत्ययकारी आहेत. मुख्य म्हणजे हा सर्व प्रवास पदरमोड सोसून आणि काही एक ध्येय मनात बाळगून केला आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)[email protected]




























































