नोंद – हायकूचे निशाण घेऊनी हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

हायकू म्हटलं की, शिरीष पै यांचीच आठवण येते. त्या आठवणीबरोबरच त्यांचा अति गाजलेला हायकू येतो…
नको रे धरूस चिमटीत
फुलपाखराचा नाजूक अंग
दुखतोय…पंखावरला रंग
अर्थात त्याला निमित्त ठरले विजय तेंडुलकर. 1963 मध्ये त्यांनी शिरीषताईंना इंग्रजीतून अनुवाद झालेला जपानी हायकू संग्रह देत म्हटलं, “आधी नाही… नंतर नाही… फक्त आताचा क्षण…” त्या क्षणाची कविता म्हणजे हायकू.
इथ शिरीषताईंच्या मनात ‘हायकू’ हा विषय घुसला. त्याचा त्या पाठपुरावा करू लागल्या. अशी बारा-तेरा वर्षे गेली. दरम्यान, आयुष्यात बरीच उलथापालथ होऊन प्रचंड एकाकीपण आलं. अशा वेळी त्या घरातील खिडकीतून बाहेर आकाशात सुन्न होऊन पाहत असताना तेथील विभ्रमांनी जादू केली. त्यांच्या चित्तवृत्ती पालवल्या. त्यांच्या मनात शब्द जागे झाले…
केव्हापासून करतोय कावकाव
खिडकीवरला कावळा
इतका भरून येतो त्याचाही गळा?
त्यानंतर शिरीष पै यांना एकामागोमाग एक हायकू सुचत गेले. त्यांचा हा ध्यास आयुष्यभर टिकला. त्यांचे बाराएक तरी हायकू संग्रह आहेत. त्यांनी हायकू मराठीत रुजवला. परिणामी हायकू म्हणजे शिरीष पै हे समीकरण झालं. त्यामुळे हायकूबद्दल कुतूहल वाटून अनेक जण हायकू लिहायला लागले. हे वेड पाहून शेवटी आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा शांता शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चिंता व्यक्त केली… “लेखकांचा, विशेषतः कवींचा एक वर्ग कृतक नावीन्यासाठी हपापलेला असतो. शिरीष पै, सुरेश मथुरे या कवींनी हायकूचे रचनातंत्र, आशय नीट समजून घेऊन हायकू लिहिले, पण बऱयाच सामान्य कवींनी ‘हायकू’ हे सध्या चलणी नाणे आहे म्हणून हायकू लिहिण्याचा सपाटा लावला आहे. अशा हायकूपासून व हायकूकारांपासून सावध राहिले पाहिजे.”
शांताबाईंची काळजी हायकूच्या शुद्धतेविषयी होती एवढाच त्याचा अर्थ. आता मधल्या काळात हायकूच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेलं आहे. त्याच्या खाणाखुणा मलुष्टे किंवा मेघना साने यांच्या हायकूसंदर्भातील पुस्तकात पाहता येतो.
हल्ली कवींमध्ये हायकूज्वर जरा कमी झालेला दिसतो, पण हे निशाण आता मर्मज्ञ रसिक अशा विजय पाडळकर यांनी हाती घेतले आहे. त्यासाठी त्यानी देशी, परदेशी हायकूचा आणि हायकूकारांचा अभ्यास करून मुळातच हे प्रकरण काय आहे हे समजावून देण्याचा विडा उचललेला आहे. ते म्हणतात, “माझ्यात एक अभ्यासक आहे, ज्याला या इतिहासाविषयी आकर्षण वाटू लागलं. मराठीत हा अभ्यास कुणी केलेला नाही. माझ्या आगामी ‘हायकूच्या विश्वात’ या ग्रंथात तो सविस्तर मांडला जाईल. त्यात माझ्या हायकूच्या संदर्भात मी अनेक उत्तम वाचकांशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, या काव्य प्रकाराविषयी बहुतेकांना काहीच कल्पना नाही. आहेत ते बरेच गैरसमज.” दरम्यान, पाडळकरांच्या शोधाशोधीत त्यांना सापडलं की, 17 एप्रिल हा जागतिक हायकू कविता दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने त्यांचा ‘हायकू ऋतू’ हा हायकू संग्रह प्रकाशित होत आहे. त्यात 323 हायकू आहेत. त्यात त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं आहे…
चंद्र घेऊन आला
चकोरासाठी चांदणे
माझ्यासाठी हायकू
तसंच संग्रहाचा समारोप करताना ते म्हणतात…
अंतिम क्षणी
मनात उरावे थोडे रंग
मागणे एवढेच
हा अनुभव वाचकांना नक्कीच येईल. विजय पाडळकरांनी एकदा सांगितलं आहे, “ज्यांना एका रात्रीत एक पुस्तक वाचायचंय त्यांनी हायकूच्या वाटय़ाला जाऊ नये. हायकू वाचा, ते हळूहळू मुरू द्या. मग त्यातून खूप रस मिळेल.”
हे पथ्य ‘हायकू ऋतू’च्या सुरुवातीलाच द्यायला हवं होतं. अर्थात त्यांच्याच एका हायकूत म्हटल्याप्रमाणे ः
ता ना पि हि नि पा जा…
दडले आहेत हे रंग
कोणत्या कप्प्यात?
हा खेळसुद्धा खेळायला हरकत नाही.