
कोर्टाची पायरी सामान्य माणसाने चढू नये अशी म्हण प्रचलित आहे. कोर्टात गेल्यानंतर तारखांवर तारखा पडून वर्षानुवर्षे कित्येक खटले सुरू राहतात. रायगड जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, तालुका न्यायालये तसेच इतर न्यायालयांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती असून १ लाख ११ हजार ३४३ खटले प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६४ हजार ३४९ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे, तर ८५ हजार ६४६ प्रकरणांना गेल्या वर्षभरापासून ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात औद्योगिकरणासह नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. परिणामी न्यायालयात मोठ्या संख्येने प्रकरणे दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात १ लाख ११ हजार ३४३ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, न्यायप्रविष्ट प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालत, फिरते न्यायालय यासह इतर उपक्रम राबविण्यात येत असून मोठ्या प्रमाणात प्रकरणाचा निपटारा करण्यात येतो. मात्र असे असले तरी आजही जिल्ह्यातील विविध न्यायालयात तारखांवर तारखा मिळून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांची संख्या वाढत आहे.
दिवसाला सात ते आठ गुन्ह्यांची नोंद
रायगडात दिवाणी प्रकरणे ४६ हजार ९९४ तर फौजदारी प्रकरणे ६४ हजार ३४९ असे एकूण १ लाख ११ हजार ३४३ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून प्रत्येक दिवशी सात ते आठ गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी दाखल होणाऱ्या नवीन खटल्यांची संख्या निकाली निघणाऱ्या खटल्यांपेक्षा जास्त आहे.



























































