
लोकलमधून उतरताना धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या मराठी तरुणावर परप्रांतीय बाप-बेट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाणे रेल्वे स्थानकावर घडली आहे. या हल्ल्यात अमित पिरणकर गंभीर जखमी झाला. अमित याच्या तोंडावर बाप-लेकाने ठोशे लगावल्याने त्याचा डोळा जायबंदी झाला. इतका भयंकर हल्ला होऊनसुद्धा ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी साधी एनसी दाखल करून आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
ठाण्यातील लोकमान्यनगर येथे अमित पिरणकर राहतो. नेहमीप्रमाणे तो कामावरून घरी येण्यासाठी निघाला. तरुणाने परळ स्थानकावरून लोकल पकडली. ही लोकल ठाणे स्थानकावर थांबण्याआधीच साहबलाल चौहान आणि सुमित चौहान या बाप-लेकाने अमित याला धक्का दिला आणि तो फलाटावर कोसळला. याचा जाब तरुणाने दोघांना विचारला असता त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सुमितने त्याच्या मानेवर मारहाण केली, तर साहबलाल याने तोंडावर ठोश्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात अमितच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार होणार होते तेवढ्यात अन्य प्रवाशांनी त्यांना पकडून ठेवले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना पोलीस ठाण्यात नेले आणि जखमीला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोळ्याच्या नसा फाटल्या होत्या. त्यामुळे त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. अखेर त्याला वडाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अमितच्या डोळ्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.




























































